सुधारीत मतदार यादीमध्ये काही विसंगती असल्याच्या तक्रारीमुळे मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकांना स्थगिती

मुंबई, १९ ऑगस्ट २०२३ : मुंबई विद्यापीठाने १७ ऑगस्टच्या रात्री उशिरा पत्रक काढून सिनेट निवडणुकीला स्थगिती दिली. विद्यापीठाच्या या निर्णयावरुन मुंबईच्या राजकारणात चांगलेच शाब्दिक वाकयुद्ध रंगले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरु भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली.तसेच मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांनी देखील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.या दोन्ही नेत्यांनी मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकांना स्थगिती देण्यामागील सविस्तर स्पष्टीकरण मागितले होते.आता मुंबई विद्यापीठाकडून याबाबतचे सविस्तर स्पष्टीकरण जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम २८ (२) (न) मधील तरतूदीनुसार अधिसभेवर दहा नोंदणीकृत पदवीधर निवडून देण्याची तरतूद आहे. या अनुषंगाने सर्व संबंधिताना कळविण्यात आले होते.९ ऑगस्ट २०२३ ला विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अंतिम सुधारीत मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. १७ ऑगस्ट २०२३ ला उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून विद्यापीठास सुधारीत अंतिम मतदार यादीमध्ये काही विसंगती असल्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्याचे कळविण्यात आले,असे मुंबई विद्यापीठाने सांगितले आहे.

या विसंगतीची तात्काळ सखोल चौकशी करून त्याच दिवशी अहवाल सादर करण्यास कळविले. त्या अनुषंगाने विद्यापीठाने मतदार यादीतील मतदारांची मोठी संख्या पाहता विसंगतीबाबत तात्काळ कार्यवाही करणे शक्य होणार नाही,तसेच याबाबत योग्य ती सखोल चौकशी करण्याकरीता विद्यापीठास वेळ आवश्यक असल्याने शासनाने विद्यापीठास योग्य ते मार्गदर्शन करण्याची विनंती करण्यात आली,असे विद्यापीठाने म्हटले आहे.

त्या अनुषंगाने शासनाकडून प्राप्त झालेल्या पत्रामध्ये मतदार यादीबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सर्व कागदपत्रांची सखोल तपासणी होऊनच निवडणूक प्रक्रिया होणे आवश्यक असल्याने, मतदार यादी सुधारीत करून निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याबाबत विद्यापीठाला निर्देश दिले. या प्राप्त निर्देशाच्या अनुषंगाने विद्यापीठाने दिनांक १७ ऑगस्ट २०२३ च्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार पुढील आदेशापर्यंत निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे,असे स्पष्टीकरण मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आले आहे. पुढील निवडणूक प्रक्रियेबाबत वेळोवेळी विद्यापीठ निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देईल.तरी सर्व संबंधितानी याबाबतची नोंद घ्यावी, असे परिपत्रकात म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा