मुंबईच्या डबेवाल्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट 

13

मुंबई, २४ सप्टेंबर २०२०: कोरोनामुळे अनेक उद्योग आणि सेवांना फटका बसलाय. मुंबईकरांची पोटाची भूक भागवणाऱ्या ”मुंबईच्या डबेवाल्यांनाही” लॉकडाऊनचा मोठा फटका बसला. जवळपास पाच महिन्यांपासून मुंबईच्या डबेवाल्यांची डबे सेवा बंद आहे. कोरोनामुळे लोकलमध्ये डबेवाल्यांना सध्या प्रवेश नसल्यानं ते आपलं काम करू शकत नाही. त्यामुळे लोकल सेवा सुरु करावी यासाठी डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरेंची त्यांच्या ”कृष्णकुंज” या निवास्थानी भेट घेतली आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काही दिवसांपूर्वीच मुंबईची लोकलसेवा सर्वांसाठी सुरु करण्याची मागणी करत ”सविनय कायदेभंग” आंदोलन केलं होते. मुंबईची लोकल ट्रेन मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी प्रमाणे आहे. त्याच्याप्रमाणे मुंबईच्या डबेवाल्यांना जेवणाचे डबे पोहोचवण्यासाठी लोकल ट्रेन सेवा ही परवडणारी आणि जलद असल्यानं मुंबई लोकल पुन्हा सुरु करावी अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनने केली आहे. असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांच्या नेतृत्वाखाली डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांना डबेवाल्यांनी मागण्यांचे निवेदन दिले आहे. 

आमचं पोट या लोकल सेवेवर अवलंबून आहे. त्यामुळे आता लोकल सुरू न झाल्यास मनसेने वात पेटवली आहे. त्याचा भडका होऊ शकतो. आम्हालाही या आंदोलनात सहभागी व्हावे लागेल, असा इशारा मुंबईतील डबेवाल्यांनी दिला होता.  लॉकडाऊन झाल्याने गेल्या जवळपास साडेपाच महिन्यांपासून डबेवाल्यांना रोजगार मिळालेला नाही. त्यामुळे डबेवाल्यांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे मुंबईतील लोकलसेवा लवकरात लवकर सुरु करा, अन्यथा डबेवाल्यांना दर महिना किमान ३ हजार रुपये अनुदान द्या, अशी मागणी डबेवाल्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. 

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा