‘मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा आणि घरातच थांबा ; पंकजा मुंडे यांची भावनिक साद

बीड, दि.२९ मे २०२०: लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा ३ जून रोजी सहावा पुण्यस्मरण दिवस आहे. हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून मुंडे समर्थक साजरा करतात. पण सध्या राज्यावर कोरोनाचं सावट आहे.
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विट आणि फेसबुक पोस्ट करून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या ३ जूनच्या पुण्यातिथी कार्यक्रमासंदर्भात जनतेला भावनिक साद घातली आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीला तुम्ही घरातच त्यांच्या आवडीचा पदार्थ बनवा आणि त्यांच्या फोटोसमोर दोन दिवे लावा,असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

३ जूनला पुण्यतिथीचा कार्यक्रम गडावर होईल पण यावर्षी कोणीही गर्दी करायची नाही. दर्शनासाठी नाही आणि मला भेटण्यासाठी देखील नाही. कोरोनाच्या संकटामुळे आपल्याला नियमांचं पालन करायचं आहे.

गडावर मोजक्याच लोकांमध्ये कार्यक्रम पार पडेल. पण त्यांचं लाईव्ह प्रक्षेपण सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवलं जाईल असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: