मुंढवा आणि केशवनगर परिसरातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आहेत. या गंभीर समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे महापालिका प्रशासनाला सर्वकष आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी हा ‘ॲक्शन प्लॅन’ महत्त्वाचा ठरणार आहे.
खासदार डॉ. कोल्हे यांनी घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत हडपसर विधानसभा मतदारसंघातील विविध समस्यांवर चर्चा झाली.
यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी वाहतूक कोंडीसोबतच कचरा समस्या आणि अपुरा पाणीपुरवठा अशा अनेक समस्यांचा पाढा वाचला. जे शहराला नको आहे, ते प्रकल्प हडपसरला का दिले जातात? हडपसरवर पालिका अन्याय करत आहे, असा तीव्र आरोपही नागरिकांनी केला.
डॉ. कोल्हे यांनी नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन, प्रशासनाला लवकरात लवकर मुंढवा-केशवनगर भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे













































