पुणे: गेल्या काही दिवसांपासून बलात्काराचे गुन्हे प्रकर्षाने समोर येत आहेत. देशामध्ये या कारणावरून आक्रोश व्यक्त केला जात आहे. यातील काही गुन्हेगारांना शिक्षाही ठोठावण्यात आल्या आहेत परंतु या सर्व गोष्टींचा अजूनही अशा प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींवर कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही. कारण अजूनही तसे प्रकार रोज कुठे ना कुठे घडून येत आहेत. असाच एक प्रकार पुण्यामध्ये आढळून आला आहे. हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या परदेशी तरुणीला लिफ्ट देऊन तिला निर्जनस्थळी नेत सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत २८ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तीवर सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी तरुणीने विमानतळ पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. तरुणीला घेऊन गेलेल्या दुचाकीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मूळची युगांडा देशाची असून ती तिच्या बहिणीसोबत कोंढवा परिसरात राहते. ती टुरिस्ट व्हिसावर आली असून, ती कपड्यांचा व्यवसाय करते. सोमवारी रात्री ती मुंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली होती. रात्री बारा वाजता ती घरी जाण्यासाठी कॅब बुक करत होती. त्यावेळी एक तरुण बाईकवर तिच्याजवळ आला. त्याने इंग्रजीमध्ये बोलत लिफ्ट देतो, असे सांगितले. त्यामुळे तरुणी त्याच्या वाईकवर बसली. काही अंतर गेल्यानंतर त्याला एका व्यक्तीचा फोन आला. नंतर ती व्यक्ती रस्त्यात भेटली. त्यांनी तरुणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून एका विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निर्जनस्थळी घेऊन गेले. त्या ठिकाणी दोघांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.