मुंबई, १९ ऑक्टोंबर २०२२ : पुण्याला सोमवारी मध्यरात्री रेकॉर्ड ब्रेक पावसानं चांगलचं झोडपून काढलं. सर्वत्र पाणी साचल्यानं पुणेकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. पुणे महापालिकेत गेल्या पाच वर्षात भाजपची सत्ता असल्यानं यासाठी भाजपलाच जबाबदार धरलं जात आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे
फडणवीस म्हणाले की पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही. पण जो पाऊस पडला त्यामुळं पाणी मोठ्या प्रमाणावर साठलंय. पण काल पडलेला पाऊस हा गेल्या दहा वर्षातला सर्व रेकॉर्ड मोडून एका रात्रीत म्हणजे २४ तासात पडलेला सर्वात जास्त पाऊस आहे. हा १०० वर्षातल्या रेकॉर्डपेक्षा थोडा कमी आहे.
ड्रेनेज तयार करताना इतक्या पावसाचा विचार केलेला नसतो. भाजपाची सत्ता पाच वर्षांपूर्वी आली, हे ड्रेनेजचे डिझाईन भाजपाने तयार केलेले नाही. हे ड्रेनेज ४० वर्षांपूर्वी तयार केलेले आहेत. आता ही परिस्थिती पाहिल्यानंतर ड्रेनेज लवकर तयार झाले पाहिजेत, यासाठी पुणे मनपा निश्चितपणे प्रयत्न करेल, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.
पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही” अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी निशाणा साधला आहे.
पुण्याची सत्ता भाजपाकडे आहे, तर मुंबईची सत्ता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाकडे आहे. मग दोन्ही ठिकाणी वेगळा न्याय का? अशी विचारणा पेडणेकर यांनी केली आहे. पावसाळ्यात उद्धव ठाकरेंवर घणाघाती आरोप करण्यात येतात, तेव्हा फडणवीस समंजसपणा का दाखवत नाहीत, असेही त्यांनी म्हणाले आहेत. पुण्यासाठी दाखवलेला समंजसपणा मुंबईसाठीही दाखवा, असा सल्ला पेडणेकरांनी फडणवीसांना दिला आहे. पाऊस कधी पडावा, कसा पडावा, किती मिलीमीटर पडावा, हे १०० टक्के आपल्या हातात नाही, असेही पेडणेकर यांनी म्हटले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे