ठाण्यात उत्पन्नवाढीसाठी महापालिकेची विशेष योजना, मालमत्ता करात सवलत

ठाणे, दि. १९ जुलै २०२०: करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत आणि महापालिकेचे अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. म्हणून प्रशासनाने मालमत्ता करामध्ये विविध सवलती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार यंदाच्या आर्थिक वर्षांचा संपूर्ण मालमत्ता कर १५ सप्टेंबपर्यंत एकत्रित भरला तर संबंधित करदात्याला दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करात दहा टक्के सवलत मिळणार आहे.

कोरोनामुळे महापालिकेला मालमत्ता कर आणि पाणी देयकांचे वाटप करणे शक्य झालेले नाही त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नाचा स्रोत असलेल्या मालमत्ता करासह पाणी देयकांची वसुली होऊ शकलेली नाही. यामुळे महापालिकेचे आर्थिक चक्र बिघडल्याचे चित्र असून या पार्श्वभूमीवर आता कर वसुलीवर भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी ठाणेकरांना मालमत्ता करामध्ये विविध सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार २०२०-२१ या वर्षांचा संपूर्ण मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्यांना दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये दहा टक्के सवलत दिली जाणार आहे. त्यासाठी १५ सप्टेंबपर्यंत कर भरण्याची मुदत देण्यात आली आहे. १६ ते ३० सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण कर भरल्यास ४ टक्के, १ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत कर भरला तर ३ टक्के आणि १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत कर भरला तर २ टक्के सवलत देण्यात येणार आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा