Pune Municipal Corporation STP regulations : शहरातल्या तीनशेहून अधिक मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये उभारण्यात आलेल्या सांडपाणी आणि मैलापाणी प्रक्रिया (एसटीपी) प्रकल्पांवर पुणे महापालिका आता अधिक कठोर नियंत्रण ठेवणार आहे. एसटीपी प्रकल्पांचा दर्जा, क्षमता आणि आवाज यांसारख्या महत्त्वाच्या घटकांची काटेकोर तपासणी करून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
एसटीपी (STP) प्रकल्पांसाठी नवीन धोरण;
शहरातील सोसायट्यांमध्ये उभारलेल्या एसटीपी प्रकल्पांबाबत महापालिकेत अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत एसटीपी प्रकल्पांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. बांधकामाच्या वेळीच चांगल्या दर्जाचे प्रकल्प उभारले जावेत, यासाठी नियमावली अधिक कडक करण्यात येणार आहे.
आवाजावर नियंत्रण, दंडात्मक कारवाईत वाढ
एसटीपी प्रकल्पांमुळे होणाऱ्या आवाजावरही महापालिका लक्ष ठेवणार आहे. प्रकल्पांचा आवाज ६० डेसिबलपेक्षा अधिक नसावा, असा नियम करण्यात आला आहे. तसेच, जे प्रकल्प बंद असतील किंवा नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्या दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ऑनलाइन पद्धतीने ‘वॉच’; सांडपाण्यावर प्रक्रिया वाढवण्याचा प्रयत्न;
सोसायट्यांमधील एसटीपी प्रकल्पांवर ‘ऑनलाइन’ पद्धतीने लक्ष ठेवण्याची योजना महापालिकेने आखली आहे. शहरातील सर्व एसटीपी प्रकल्प व्यवस्थित सुरू राहिल्यास, दररोज ११० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करणे शक्य होईल, असे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.
शहरातील मोठ्या सोसायट्यांसाठी एसटीपी प्रकल्प अनिवार्य
पुण्यातील शंभराहून अधिक सदनिका असलेल्या मोठ्या गृहप्रकल्पांमध्ये एसटीपी प्रकल्प उभारणे बंधनकारक आहे. मात्र, अनेकदा बिल्डर चांगल्या दर्जाचे प्रकल्प उभारण्यास टाळाटाळ करतात, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने हे कठोर पाऊल उचलले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे