पुणे, दि.१८मे २०२० : पिंपरी चिंचवड येथील वाकड परिसरात लंडन ब्रिजखाली कुख्यात गुंड महाकाली. याचा भाऊ मनोज उर्फ डिंगऱ्या ढोलकिया याचा रविवारी(दि.१७)रोजी रात्री उशिरा डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड मधील गुंडगिरी पुन्हा एकदा समोर आल्याचे चित्र पहायला मिळाले.
याप्रकरणी पोलिसांनी डिंगऱ्याची हत्या केल्या प्रकरणी आदम उर्फ गोट्या खान या संशयिताला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २०१० साली कुख्यात गुंड महाकाली उर्फ राकेश ढकोलिया याचा एन्काउंटर करण्यात आला होता. त्यानंतर महाकाली टोळी अनेक बेकायदेशीर काम करत होती. हे काम महाकालीचा भाऊ मनोज उर्फ डिंगऱ्या ढकोलिया बघत होता.
सदर घटनेच्या माहितीप्रमाणे
डिंगऱ्या आणि आदम हे दारू पिण्यासाठी पुनावळे येथील लंडन ब्रिजखाली बसले होते. दारू पित असताना त्यांच्यात भांडण झाले. यावेळी आदम याने लाकडी दांडक्याने डिंगऱ्याला डोक्यात मारहाण केली. या मारहाणीत डिंगऱ्या गंभीर जखमी झाला होता. मारहाण केल्यानंतर आदम घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी डिंगऱ्याला त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं.
डिंगऱ्यावर नऊ गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्याला तडीपार करण्यात आले होते. मात्र, तडीपारीच्या आदेशाचा भंग करून तो पिंपरी चिंचवड शहरात आला होता. तर त्याची हत्या करणाऱ्या आदम विरोधातही गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: