चारित्र्यावर संशय घेऊन डोक्यात वरवंटा घालून पत्नीची हत्या, भंडारा जिल्ह्यात

28

भंडारा, दिनांक ९ ऑक्टोबर २०२२ : संसाराचा गाडा एकमेकांचा विश्वास आणि पाठबळावर सुरू असतो. परंतु यात जर का संशयाचे भूत डोक्यात शिरले तर मनुष्य काय करेल याचा नेम नाही. अशीच घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यामध्ये पिंपळगाव निपाणी येथे घडली आहे. भंडारा जिल्ह्यात चारित्र्यावर संशय घेऊन डोक्यात वरवंटा घालून पत्नीची पतीने हत्या केली. या प्रकरणी पतीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्चना अरविंद रामटेके वय ४० वर्षे असे हत्या झालेल्या मृत पत्नीचे नाव आहे. तर आरोपी पती अरविंद माधव रामटेके वय ४३ वर्षे याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

अरविंद रामटेके आणि अर्चना यांचा २० वर्षांपूर्वी विवाह झाला होता. अरविंद हा मागील दोन वर्षांपासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात नेहमीच वाद होत होते. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणे होत असत.

काल शनिवारी पती पत्नीचे भांडण विकोपाला गेले. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर रात्री आठ वाजेच्या दरम्यान अरविंदने रागाला जाऊन घराचा दरवाजा बंद केला आणि पत्नीच्या डोक्यात वरवंटा घातला.

सदर घटना गावात माहीत होताच गावकऱ्यांनी अर्चनाला उपचारासाठी भंडारा सामान्य रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मुलगा भाविक रामटेके याने दिलेल्या तक्रारीवरून पती अरविंद रामटेके याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर