पॅरोलवर असलेल्या राम रहीमचा म्युझिक व्हिडीओ लॉन्च

32

चंडीगढ़, २७ ऑक्टोबर २०२२, डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीम चाळीस दिवसांच्या पॅरोलवर बाहेर असून, दिवाळीच्या मुहूर्तावर एक व्हिडिओ लॉन्च केला आहे. राम रहीमने यूपीतील बरनावा आश्रमात पाच वर्षानंतर पहिल्यांदाच दिवाळी साजरी केली.

२२ तासांत ४२ लाख लाईक !

विशेष बाब म्हणजे लॉन्चिंगच्या २२ तासांत ४२ लाख लोकांनी व्हिडिओला लाईक केले. पंजाबी भाषेत लॉन्च करण्यात आलेल्या ३ मिनिट ५२ सेकंदाच्या गाण्यात राम रहीमने स्वतः काम केले आहे. २०१७ मध्ये बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमला वीस वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या अर्जानंतर गेल्या आठवड्यात त्याला पॅरोल मंजूर करण्यात आला होता.

नुकतीच त्याची कारागृह प्रशासनाने पॅरोलवर सुटका केली होती. यावरून बराच वाद झाला होता. मात्र हरियाणा सरकारने पॅरोल मंजूर करणे हे तुरुंग अधिकाऱ्यांचे काम असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे याच दरम्यान हरियाणाच्या आदमपूर मतदारसंघातून पोटनिवडणूक होणार आहे.

काँग्रेसचे आमदार कुलदीप बिश्नोई यांच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. भाजपने येथून कुलदीप यांचा मुलगा भव्य बिश्नोई यांना उमेदवारी दिली आहे. निवडणुकीची दिशा बदलण्यासाठी राम रहीमला मैदानात उतरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

गुरुजींच्या कृपेने प्रत्येक दिवस माझ्यासाठी दिवाळी !

या व्हिडीओमध्ये राम रहीमचे जुने शॉट्स त्याचे गुरु शाह सतनाम यांच्यासोबत चित्रीत करण्यात आले आहेत. राम रहीमने त्याला आपले नवे भजन म्हटले आहे. त्याचबरोबर या गाण्याचे कंपोझिंग, एडिटिंग, संगीत यासह सर्व कामे स्वत: करण्याचा दावा त्याने केला आहे. रंगीबेरंगी कपड्यांमध्ये राम रहीम व्हिडिओमध्ये म्हणत आहे की, दिवाळी हा एक दिवसाचा सण असला तरी गुरुजींच्या कृपेने त्याच्यासाठी प्रत्येक दिवस दिवाळी आहे.

राम रहिमचा पॅरोल रद्द करण्याची मागणी

राम रहिमने म्युझिक व्हिडीओ लॉन्चिंगसह ऑनलाईन सत्संग कार्यक्रम देखील केला. या कार्यक्रमाला भाजपचे अनेक नेते सहभागी झाले होते. त्यावर चांगलाच वादंग उठला असून राम रहिमची पॅरोल रद्द करण्याची मागणी होत आहे.

राम रहिमला न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे, मात्र, हरयाणा सरकार पाहिजे तेव्हा त्याला पॅरोल देत आहे. तो सत्संग आयोजित करतो, आणि हरयाणा सरकारचे उपसभापती आणि महापौर या सत्संगाला हजेरी लावतात. त्यामुळे सरकारने राम रहिमचा पॅरोल रद्द करावा आणि तात्काळ त्याला तुरुंगात पाठवावे, अशी मागणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक