महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रारूप प्रभागरचनेवरील सुनावणी ही केवळ एक उपचार असून, प्रत्यक्षात त्यात कोणताही बदल होणार नाही, असा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. केवळ दोन दिवसांत सहा हजार हरकतींवर सुनावणी घेणे हे ‘दिखावा’ असल्याचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या दबावाखाली ही प्रभागरचना तयार करण्यात आल्याचा आरोप करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी थेट केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि भाजपचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांना जबाबदार धरले. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपाचा आरोप केला आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून नैसर्गिक भौगोलिक सलगता तोडण्यात आल्याचाही विरोधकांनी ठाम आरोप केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे












































