भंडारा, २४ सप्टेंबर २०२० : भंडारा जिल्ह्यात प्रभावी कोविड नियंत्रणासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही 7मोहीम राबवण्यात येत असून, या मोहिमेत ८६१ आरोग्य पथक घरोघरी जाऊन आरोग्य जागृती करणार आहेत. जिल्ह्यातल्या २ लाख ८५ हजार ४१४ कुटुंबांना भेटी देऊन ही पथक प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याबाबतची त्रिसुत्री आवश्यक असल्याचे महत्व नागरिकांना या मोहिमेत पटवून देणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यवतमाळ जिल्ह्यातही बाधितांचा आणि मृतांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर योग्य सर्व्हेक्षण झाले तर या दोन्ही बाबींवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे असं सांगत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी गृहभेटीदरम्यान पूर्वव्याधीग्रस्त आणि लक्षणे असलेल्या नागरिकांचा गांभिर्याने शोध घेण्याचे निर्देश दिले. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम पहिल्या टप्प्यात गांभिर्यानं राबवली तर दुसरा टप्पाही सोपा जाईल, असं ते म्हणाले.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणे शक्य होणार असून, कोरोनाचे पूर्वनिदान होण्यास मदत होणार आहे. पूर्वनिदान झाले तर मृत्यूचे प्रमाणही कमी होणार आहे, असं प्रतिपादन गडचिरोली जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं. नागरिकांनी आपल्या घरी तपासणी आणि माहिती देण्यासाठी येणा-या स्वयंसेवकांना सहकार्य करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी