माझी मुख्यमंत्री ठाकरेंना धक्का! शेवटी मविआच्या १२ आमदारांची यादी राज्यपालांकडून रद्द

मुंबई, ४ सप्टेंबर २०२२: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडलं आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला कारण शिवसेनेच्या अनेक आमदारांनी भाजपसोबत जाऊन नवीन सत्ता स्थापन केली. या दरम्यान आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना धक्काच दिला आहे. काल मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेली जुनी यादी रद्द करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवले होतं. आत्ता ठाकरे सरकारने राज्यपालांकडून नियुक्त करण्यासाठी दिलेली आमदारांची यादी रद्द करण्यात आली आहे.

राजभवनाने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेल्या पत्रात महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली आमदारांची यादी रद्द करण्यात येत असल्याचं सांगितलं आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०२० मध्ये विधान परिषदेतल्या १२ जागांसाठी राज्यपाल नियुक्त उमेदवारांची यादी पाठवली होती. पण राज्यपालांनी ही यादी मंजूर केली नाही. त्यामुळे विधान परिषदेतल्या १२ जागा आता रिक्त आहेत. या जागांवर शिंदे फडणवीस सरकारकडून आता १२ आमदारांना विधानपरिषदेवर नियुक्त करण्यासाठी यादी पाठवणार आहेत. यामध्ये कोणत्या नेत्यांची नावे असतील याकडे विरोधकांचं लक्ष लागलं आहे. शिंदे गटाला आणि भाजपला कितीचा कोटा मिळणार यासाठी त्यांना गणित ठरवायला लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा