पुणे, २८ सप्टेंबर २०२२: १९२९.. हा दिवस केवळ पृथ्वीच नाही, तर आकाश , स्वर्ग सगळ्यांसाठीच आनंदाचा होता. या दिवशी सात स्वरांनी शारदेच्या मुखातून एका गळ्यात सामावून आनंदघनाच्या रुपाने पृथ्वीवर जन्म घेतला. त्याच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गानकोकिळा, भारतरत्न, आनंदघन लता मंगेशकर. आज लता मंगेशकर यांचा वाढदिवस. इंदौर येथे जन्म झालेल्या लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा मंगेशकर. नंतर लता मंगेशकर या नावाने त्यांची कारकिर्द सुरु झाली. ती पुढील आठ दशके सुरु राहिली. पार्श्वगायिका आणि संगीतकार म्हणून लतादिदी जगप्रसिद्ध आहेत.
लतादीदींनी तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली होती. त्यात हिंदी आणि मराठी गाण्यांचा समावेश आहे. त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. १९८७ मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल २००१ मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळविणाऱ्या एम.एस. सुब्बुलक्ष्मी नंतर त्या दुसऱ्या गायिका आहेत. २००७ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, “द लीजन ऑफ ऑनर”ने सन्मानित केले.
त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, चार फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, दोन फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार मिळाले. १९७४ मध्ये, लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या.
त्यांनी १९४३ साली गजुभाऊ या मराठी चित्रपटासाठी पहिले गाणे रेकॅार्ड केले आणि मग कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या गाण्यांची यादी करायची म्हंटल्यास खंड कमी पडतील .
हिंदी, तमिळ, कन्नड, बंगाली, मराठी, गुजराती,नेपाळी, उडीया, पंजाबी, मल्याळम अशा अनेक भाषेत लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजाचा ठसा उमटवला. नाम गुम जाएगा, अखेरचा हा तुला दंडवत, तुझे देखा तो ये जाना सनम, अशा प्रत्येक दशकात लता मंगेशकर यांचा अजरामर स्वर आहे.
आज लता मंगेशकर अस्तित्वाने आपल्यात नाही. पण त्यांचा स्वर मनुष्य अस्तित्व असेपर्यंत राहणार , हे सत्य आणि सत्व आहे. आज स्वर्गात लता मंगेशकर यांचे औक्षण केले जात असेल. त्यांच्यावर फुलांची उधळण केली जात असेल. समोर सात स्वर नतमस्तक होऊन उभे असतील. गंधर्व, यक्ष या गानकोकिळेसाठी आरती ओवाळत असतील. पांढऱ्या साडीतल्या, दोन लांबसडक वेण्या घातलेल्या लता दिदी समोर शांत, शीतल मुद्र्ने बसलेल्या असतील. त्यांचे तेज चैतन्य पसरवत असेल.
तर पृथ्वीवर प्रत्येक जण एकच आवाज ऐकत असेल … नाम गुम जाएगा… चेहरा ये बदल जाएगा. मेरी आवाज ही पहचान है… वाढदिवसाच्या शुभेच्छा .. लता दिदी… जिथे असाल तिथे तुमच्या आवाजाने आनंदघन बरसत असाल. . हे नक्की .
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस