नगर-दौंड-बारामती मार्गाचा तिढा सुटणार कसा ?

दौंड: दौंड तालुक्यात विविध योजनांच्या माध्यमातुन रस्त्यांच्या कामास सुरुवात झाली आहे.गेली वर्षभरापेक्षा जास्त कालावधी उलटून जात असताना देखील या कामाला गती मिळत नाही.त्यामुळे संपुर्ण दौंड तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा झालेली आढळुन येत आहे.रस्त्यांच्या कामात कुठलेही पूर्व नियोजन नसल्याने ठीक ठिकाणी रस्ते मोठ्या प्रमाणात खोदून ठेवले गेले आहेत.मात्र यावर काम काहीच नसल्याने सर्व सामान्य नागरिकांची,वाहन चालकांची गैरसोय होत आहे.तर बऱ्याच ठिकाणी रस्ते रुंदीने कमी करण्यात आले असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
दौंड मधील मुख्य शहरातून प्रामुख्याने नगरहून बारामती कडे जाणारा महामार्ग तसेच अष्ठविनायक मार्ग अश्या रस्त्यांची कामे सुरु आहेत.दौंड शहरातून जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यालाच हे रस्ते जोडले गेल्याने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणातून जाताना वाहनचालकांना मोठ्या वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.तर मध्यवर्ती ठिकाणातील अतिक्रमणे न काढताच रस्ता करण्याचे काम सुरु असल्याने विस्तारीकरण फक्त कागदावरच राहिले असल्याचे पहावयास मिळते.परिणामी वाहतुकीचा खोळंबा हा ठरलेलाच.या सर्व मनमानी कारभाराने दौंड शहराच्या विकासाला खीळ बसली असल्याने शहरातील अनेक व्यापाऱ्यांसह ग्रामीण भागातील नागरिकांनी,शेतकऱ्यांनी व्यवसायाच्या दृष्ठीकोनातून अन्य ठिकाणी जाण्यास सुरुवात केल्याचे वास्तविक चित्र सध्या दिसून येते.
दरम्यान याबाबत दौंडच्या नागरिकांनी एकत्रपणे रस्त्याच्या रुंदीकरणात होणाऱ्या राजकीय हस्तक्षेपाचा निषेध म्हणुन रस्त्यावर मूक निदर्शने केली.त्यामुळे या समस्येला काही प्रमाणात चालना मिळाली.याची दखल या विभागाच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी घेत रस्ते विकास महामंडळ यांचे अधिकारी यांची बैठक घेऊन रस्त्याच्या रुंदीकरणात होणाऱ्या समस्या व कामात असणारी दिरंगाई याबाबत चर्चा केली.तर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना देखील दौंडच्या नागरिकांनी यावर तोडगा काढण्यासाठी लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात शहरातील वाहतूक समस्यांच्या बाबतीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धुळीने माखलेले शहर___सध्या दौंड परिसरात सुरु असणारी रस्त्याचे कामे हि खर्या अर्थाने दौंडचा कायापालट करणारी ठरणार आहेत.मात्र कासवगतीने सुरु असलेली कामे,प्रशासनात असलेला नियोजनाचा अभाव व विकासाला खिंडार पडणाऱ्या राजकीय हस्तक्षेपाने शहराच्या समस्या वाढवल्या आहेत.अर्धवट खोदलेल्या रस्त्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे.रस्त्याच्या कडेला बसलेल्या हातगाडी व्यवसायापासून ते मोठ मोठ्या व्यापारी वर्गाला याचा त्रास होतच आहे.शहरातील प्रत्येक दुकानावर धुळीची चादर ओढलेली दिसून येते त्यामुळे दौंड शहराची ओळख धुळीने माखलेले शहर अशीच झाली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा