संगमनेर : संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील योगेश भाऊसाहेब गुंजाळ याच्यावर बिबट्याने हल्ला करत त्याला जखमी केले आहे. ही घटना गुरुवारी (दि.२३) घडली.
दुसऱ्या घटनेत समनापूर शिवारातील गवाळ वस्ती (भास्करवस्ती) येथे बिबट्यांच्या हल्ल्यातून महिला मजूर बालंबाल बचावल्या आहेत. या दोन्ही घटनांमुळे सुकेवाडी व समनापूर परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
संगमनेरजवळील सुकेवाडी शिवारातील गुंजाळ वस्तीवर राहणारे योगेश गुंजाळ यांच्यावर उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला चढविला. यावेळी योगेशने जोरजोरात आरडाओरडा केला. त्याचे बंधू संजय व नागरिकांच्या आरडाओरडामुळे बिबट्याने धूम ठोकली.
समनापूर याठिकाणी असलेले शेतकरी सुनील काशिनाथ भास्कर यांच्या शेतामध्ये महिला मजूर बेबीताई भास्कर, रूपाली भवर, शकीला शेख, नजमा शेख, सोनाली भवर, माया नेहे, विमल टोपले या महिला कपाशी काढत असतांना शेजारील उसाच्या शेतामधून दोन बिबट्यांनी कपाशी काढत असलेल्या महिलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
परंतु, याठिकाणी दहा ते पंधरा महिला असल्याने त्यांनी आरडाओरड केला.
रस्त्याच्या कडेचे मजूर धावले. त्यामुळे दोन्ही बिबटे शेतात पळून गेल्याने महिला बालंबाल बचावल्या आहेत. याठिकाणी वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे.