नगरमध्ये टंकलेखन परीक्षेला बसले डमी विद्यार्थी

अहमदनगर : मराठी विषयाच्या संगणक टंकलेखन परीक्षेत नगरमध्ये डमी विद्यार्थ्यांचा प्रकार उघडकीस आला आहे. नगर तालुका पोलिसांनी याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

राज्यात सध्या संगणक टंकलेखनाच्या परीक्षा सुरू आहेत. त्यानुसार नगरच्या नेप्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग या कॉलेजच्या केंद्रावर मराठी विषयाची संगणक टंकलेखन परीक्षा सुरू होती.
या केंद्रावर संचालक म्हणून जयश्री कार्ले या कार्यरत होत्या. परीक्षा हॉलमध्ये काही विद्यार्थी संशयास्पद हालचाली करत होते. त्यावेळी कार्ले यांनी या विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तपासले. त्याचबरोबर स्वाक्षरीपट देखील तपासला.
त्यावेळी ४ विद्यार्थी हे परीक्षेला डमी विद्यार्थी म्हणून बसलेले आढळले. कार्ले यांनी विद्यार्थ्यांना विचारणा केल्यावर या विद्यार्थ्यांनी त्यांना अरेरावीची भाषा वापरली. त्यानंतर परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. परिणामी परिक्षेला उशिरा होऊ लागला.
जयश्री कार्ले यांनी या प्रकाराची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानुसार केंद्रावर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी या चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.
विद्यार्थ्यांना नगर तालुका पोलीस ठाण्यात आणल्यानंतर चौकशी केली. तिथे या विद्यार्थ्यांनी दुसर्‍याच्या ओळखपत्रावर (डमी) परीक्षेला बसलो असल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्यानुसार अधिक तपास केला. ज्या विद्यार्थ्यांचे हे डमी विद्यार्थी परीक्षे देत होते. त्यांनाही गुन्ह्यात आरोपी म्हणून समावेश केला आहे.
संतोष मारूती चौरे (रा. पाईपलाईन रोड), आदीनाथ नामदेव सोलट, नवनाथ नामदेव सोलट (रा. मिरी, ता. पाथर्डी), युवराज रामदास सुळे (रा. पाटोदा, जि. बीड), मयुर चंद्रकांत घोडके, मोरेश्वर दिलीप गीते, तेजस जालिंदर बोरुडे, प्रवीण अर्जुन गाडेकर (रा. नगर) या आठ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. सरकारी कामात अडथळा आणणे, जाणिव पूर्वक संगनमताने फसवणूक करणे आदी कलमांनुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या गुन्ह्यात संतोष चौरे, आदीनाथ सोलट, नवनाथ सोलट, युवराज सुळे या चार जणांना अटक करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र संचालक जयश्री कार्ले यांनी फिर्याद दिली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा