नागपूर, १२ऑक्टोंबर २०२३ : देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. नवरात्रीच्या या विशेष पवित्र उत्सवानिमित्त शहरातील (नागपूर) अनेक भागात गरब्याचे आयोजन केले जाते. अशा स्थितीत संपूर्ण शहरात गरब्याचा उत्साह दिसून येत आहे. या गरब्याच्या विशेष प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागपूर पोलीस चोख बंदोबस्त ठेवणार आहेत.
या नवरात्रीत गरबा, डीजे आणि मोठ्या आवाजात गाणी वाजवण्याची परवानगी फक्त रात्री १० वाजेपर्यंत आहे. नवरात्रीनिमित्त गरब्याचे आयोजन करण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी, २२ आणि २३ ऑक्टोबरच्या या शेवटच्या २ दिवसांच्या गरब्यासाठी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. पोलिस आयुक्तांनी दिलेल्या मुदतीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. शेवटचे दोन दिवस रात्री १२ वाजेपर्यंतची वेळ असली तरी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या आदेशानंतर ही वेळ बदलता येणार आहे. अशा स्थितीत रात्री उशिरा होणाऱ्या मेळाव्यांबाबत प्रशासन आता अधिकच कडक झाले आहे.
विश्व हिंदू परिषदेने गरब्याबाबत गरबा मंडळांना आवाहन केले आहे. गरब्यात केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा आणि त्यासाठी आधार कार्ड तपासले जावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. जर प्रवेश दारात आधार कार्ड तपासण्यासाठी कर्मचारी नसेल तर आम्ही विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देऊ आणि पोलिसांनाही बोलवू, असे विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड