नागपूर, १३ जानेवारी २०२३ : पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र तसेच जिल्ह्यातील सर्व पारधी बेड्यावर विशेष राजस्व अभियान अंतर्गत राशनकार्ड, आधार कार्ड, मतदान नोंदणी, जात प्रमाणपत्र, वयोवृद्ध, अनाथ बालके, विधवा महिलांना श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा करिता विशेष शिबीर राबविण्याबाबत आदिवासी पारधी विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल पवार तसेच माजी सरपंच अतिश पवार, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदिवासी सेवक पुरस्कृत बबन गोरामन यांच्या मार्गदर्शनाखाली पारधी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आदी समस्याबाबत विविध मागणीचे निवेदन मा. श्री विपीन इटनकर जिल्हाधिकारी नागपूर यांना देण्यात आले.
यावेळी मा. जिल्हाधिकारी नागपूर यांनी तात्काळ जिल्ह्यातील सर्व पारधी बेड्यावर विशेष शिबिराचे आयोजन करणे व सोबतच अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीकडून पारधी विद्यार्थ्यांना स्थानिक गृह मौका चौकशीद्वारे शाळकरी व तसेच कॉलेज विद्यार्थ्यांना सरसकट प्रस्ताव घेऊन सर्व पात्र पारधी समाजातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटप करावेत, असे आदेश संबंधित विभागास देण्यात आलेत.
महाराष्ट्र आदिवासी पारधी समाजाची संख्या लक्षणीय आहे. परंतु सतत भटकंतीमुळे शासन दरबारी नोंद नसल्या कारणास्तव आदिवासी भटक्या आदिम पारधी समाजातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास व्हावा, याकरिता नागपूर जिल्ह्यातील सर्व पारधी बेड्यावर विशेष राजस्व अभियान अंतर्गत राशनकार्ड, आधार कार्ड, मतदान नोंदणी, स्थानिक चौकशी द्वारे जात प्रमाणपत्र निर्गमित करावेत. तसेच अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी वनहक्काची मान्यता अधिनियम २००६, नियम २००८ व सुधारणा नियम २०१२ चे भारत राजपत्र दि. २ जानेवारी २००७ वनहक्क कायदा अंतर्गत सरकार झूडपी जंगलात पारधी समाज वर्षानुवर्षे भटकंती करीत आहेत.
त्या ठिकाणी मागील २००५ पूर्वीचें वास्तव्य करीत असलेल्या सर्व पारधी समाज बांधवांना राहत्या घराचे मालकी हक्काचे पट्टे मिळावेत याकरिता तात्काळ ग्रामपंचायत वन हक्क समितीकडून वनहक्क दावे तयार करावेत तसेच पारधी समाजातील वयोवृद्ध, अनाथ बालके, विधवा महिलांना श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेतंर्गत विशेष शिबीराचे आयोजन तात्काळ करण्यात यावे, अशी विनंती आदिवासी पारधी विकास परिषदेकडून जिल्हाधिकारी नागपूर यांना करण्यात आली आहे.
न्युज अनकट प्रतिनीधी : नीता सोनवणे