जालना,१४ सप्टेंबर २०२० :जालना जिल्ह्यातून जाणाऱ्या समृध्दी महामार्गावरील बहुचर्चित इंटरचेंज पॉईंट अर्थात चढ-उतार स्थळ जालना तालुक्यातल्या निधोना शिवारात होणार असून, याबाबतची अधिसूचनाही प्रसिध्द करण्यात आली आहे.
जालना आणि बदनापूर तालुक्यातल्या २५ गावांतून ४२ किलोमीटरवरून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृध्दी महार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या महामार्गावर इंटरचेंजपाईंट उभारणीसाठी जालना तालुक्यातल्या निधोना शिवारातल्या १३ गटांमधल्या ७० एकर जमिनीचं संपादन केलं जाणार आहे.
याबाबतची अधिसूचना जिल्हा प्रशासनाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे. निधोना शिवारात इंटरचेंजपाईंट झाल्यास दरेगाव शिवारात होत असलेलं ड्रायपोर्ट तसच जालना औद्योगिक वसाहतीला थेट समृध्दी महामार्गाशी जोडता येणार असल्यानं जिल्ह्याची दळवळण सुविधा अधिक गतिमान होणार आहे.
इंटरचेंजपाईटमध्ये दोन ठिकाणी ट्रक टर्मिनल, एका ठिकाणी सौरउर्जा प्रकल्प आणि टोल प्लाझाची निर्मिती केली जाणार आहे. इंटरचेंजसाठी लागणाऱ्या जमिनीचं मोजमाप सुरु झालं असून येत्या काही दिवसात शेतकऱ्यांनाकडून जमिनीच्या थेट खरेदीचा व्यवहार पूर्ण केला जाणार असल्याच रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी