नको आम्हाला पाटलांची साडी…

पुणे: डेक्कनजवळच्या खंडूजीबाबा चौकात राष्ट्रवादीतर्फे शहराध्यक्ष आणि नवनिर्वाचित आमदार चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली ‘चंपा साडी हाय हाय’ म्हणत जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. प्रवक्ते अंकुश काकडे तसेच महिला कार्यकर्त्या व पक्षाचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

दिवाळीच्या निमित्ताने कोथरूड मतदारसंघातून नुकतेच आमदारपदी निवडून आलेले चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातील तळागाळातील भगिनींना स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून एक लाख साड्या वाटपाचा उपक्रम करण्याचा निर्णय घेतला. हा उपक्रम विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य तर बनलाच, पण वाटलेल्या साड्या निकृष्ट दर्जाच्या, फाटक्या, रंग उडालेल्या, आखूड असल्याचे प्रत्यक्षात निदर्शनास आल्याने पाटील यांनी तळागाळातील माताभगिनींचाही रोष ओढवून घेतला आहे. या पार्श्वभूमीवर घरकामगार संघटना, कचरावेचक व असंघटित कामगारांच्या संघटनेच्या अध्यक्ष किरण मोघे म्हणाल्या, ‘साडी वाटपापेक्षा असंघटित माताभगिनींसाठी नियमित वेतन, पेन्शन आणि अन्य सुविधांची उपलब्धता कशी करता येईल, हे अधिक महत्त्वाचे आहे. पाटील यांनी आपली आमदारकी या वंचित, उपेक्षितांच्या कायमच्या कल्याणासाठी भरीव काम करून सार्थकी लावावी, असे आमचे सांगणे आहे.’ असे या संघटनेच्या अध्यक्षा किरण मोघे यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.

कष्टकऱ्यांकडूनही निषेध कोथरूडचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील महिलांना स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून साड्या वाटप करताना गरीब, धुणे भांडी करणाऱ्या आणि कागद वेचणाऱ्या भगिनींना आपण प्राधान्य देत असल्याचे जाहीर केले होते. मात्र, या उपक्रमातून त्यांची सरंजामी मनोवृत्ती दिसून येते; त्याचा आम्ही घरेलू कामगार आणि असंघटित कामगारांच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करत आहोत. घरेलू कामगार, कचरावेचक, बांधकाम मजूर इत्यादी असंघटित क्षेत्रात मजुरी करणाऱ्यांना अशा पद्धतीने कोणाचे दान नको असून, सन्मानाने जगण्यासाठी किमान वेतन, पेन्शन आणि सामाजिक सुरक्षा देणारे कायदे आवश्यक आहेत. आपल्या आमदारकीची कारकीर्द पाटील यांनी या सत्कारणी लावल्यास बरे होईल, असे अशा शब्दांत पाटील यांच्या साडी वाटपावर कष्टकऱ्यांनी एकत्रितरीत्या टीका केली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा