लातूर मध्ये नमो महारोजगार मेळावा संपन्न

लातूर २५ फेब्रुवारी २०२४ : राज्य शासनाने प्रत्येक महसूल विभागात नमो महारोजगार मेळावा आयोजीत केला आहे. त्या अंतर्गत हा मेळावा लातूर येथे २३ व २४ फेब्रुवारी रोजी पार पडला. या नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

२४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीमधून उद्योजकांनी ४ हजार ५४८ उमेदवारांची जागेवरच निवड केली. तर ७ हजार ८९७ जणांच्या निवडीबाबतची कार्यवाही पुढील टप्प्यात होणार आहे. यावेळी झालेल्या करिअर मार्गदर्शन शिबिरालाही युवा वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.जागेवर निवड झालेल्या युवक-युवतींना आमदार संभाजी पाटील निलंगेकर, विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात निवडपत्राचे वितरण करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, प्रेरणा होनराव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत ३५ जणांना १ कोटी ५१ लाख ७६ हजार रुपये, मुद्रा योजना अंतर्गत ५ व्यक्तींना १८ लाख रुपयांचे धनादेश उपस्थितांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

या मेळाव्याचे औचित्य साधून जिल्हा परिषद अंतर्गत १४ संवर्गात अनुकंपा तत्वावर निवड झालेल्या १० युवक-युवतींना एकाच वेळेस यावेळी नियुक्ती पत्र वितरीत करण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनीधी : सलीम शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा