मुंबई, २० नोव्हेंबर २०२०: नितीन नांदगावकर यांनी वांद्रे येथील कराची बेकरीला भेट देऊन दुकानाचं नाव बदलण्याची मागणी केली होती. या संभाषणाचा व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होत आहे. मात्र, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या भूमिकेत तथ्य नसून ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं सांगितलं. ट्विटरच्या माध्यमातून ट्विट करत राऊतांनी याबाबत मत व्यक्त केलं.
काय म्हणाले राऊत
कराची बेकरी आणि कराची स्वीट्स हे मागील ६० वर्षांपासून मुंबईत आहेत. त्यांचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. त्यामुळं दुकानाच्या नावात बदल करण्याच्या मागणीत काहीच तथ्य नाही. मुळात या दुकानाच्या नावात बदल करण्याची मागणी करणं ही शिवसेनेची भूमिका नाहीच, असं राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट केलं.
काय आहे प्रकरण
बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. नांदगावकर यांनी मुंबईतल्या वांद्रे येथील ‘कराची स्वीट्स’ बेकरीचं नाव बदलण्यात यावं, अशी भूमिका मांडली होती. या व्हिडिओमध्ये ते दुकान मालकाकडं दुकानाचं नाव आजोबा किंवा वडिलांच्या नावावरुन ठेवण्याची मागणी करताना दिसत आहेत. दुकानदारांना आपण नाव बदलण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी दिल्याचं म्हणत त्यांनी नावाची अक्षरं स्पष्ट दिसतील असे काही फोटोही पोस्ट केले होते. कराची पाकिस्तानात आहे आणि पाकिस्तान हा दहशतवादाचा देश आहे, असंही ते म्हणताना दिसत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

