मुंबई, २६ जुलै २०२२: संजय राऊत यांनी उद्धव ठाकरें यांची मुलाखत घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावरील आरोपांचे सत्र काही संपताना दिसत नाही. त्यात आता भर पडली आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची. आधीच छत्तीसचा आकडा असलेल्या नारायण राणेंच्या हाती यामुळे आयतं कोलीतच मिळालं आहे. त्यांनी तर थेट पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंच्या मुलाखतींवर तोंडसुख घेतले.
यावेळी नारायण राणे यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे खोटारडे आहेत. उद्धव ठाकरे स्वत: काहीच करत नाहीत. सगळे निर्णय आदित्य ठाकरे घेतात. एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खातं होते. पण ते खातं आणि इतर खात्याचा व्यवहार आदित्य ठाकरे चालवत होते. आदित्य ठाकरेंना काय राजकारण कळतं. हे मला माहित आहे. जर मी मातोश्रींवर आनंदात आहे, असं जर उद्धव ठाकरे म्हणतात, तर मग वर्षा बंगला सोडताना का दु:ख झालं. मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे लाचार झाले होते. पण हेच मुख्यमंत्री पद गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना मराठी माणूस आठवला का ? वारसा रक्तानींच असतो का? विचारांनी नसतो का? असे सवाल विचारायला ते विसरले नाही. अडीच वर्षात केवळ खोकेच घेतले. काहीच काम केलं नाही. एकीकडे मंत्रीपद घ्यायचं आणि दुसरीकडे सुपारी घ्यायची अशा पद्धतीने अडीच वर्षात कामकाज केलं. आता सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियान ही सगळी प्रकरणं आता बाहेर येतील. उद्धव ठाकरे हे पक्षपात करायला लागले, अशा अनेक आरोपांच्या फैरी नारायण राणे यांनी झाडल्या.
संजय राऊतांनी शिवसेनेचं वाटोळं केलं. त्यांनी आता तरी शांत बसावं. शिवसेनेचे आमदार मोदी आणि शहांच्या कृपेने आले. पण आता शिवसेनेत पाच आकडा दिसणार नाही. सेनेतले उरलेले आमदार केवळ सहा महिन्यातच निघून जातीलं, असं भाकितंही त्यांनी यावेळी केलं. उद्धव ठाकरेंनी जे आमदारांना दिलं नाही, ते एकनाथ शिंदे यांनी दिलं. आमचं श्रद्धास्थान बाळासाहेब ठाकरे आहेत. मातोश्रीच्या भिंतीच्या आतल्या गोष्टी मला माहित आहे. असं म्हणतं त्यांनी एकुणच मुलाखतीच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा खरपूर समाचार घेतला. एकुणताच ही मुलाखत गाजतेय… नव्हे… वाजतेय…
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस.