नारायणगाव येथे जमली “काव्यमैफल”

आळेफाटा : शिवांजली साहित्यपीठ व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाळकवाडी (पिंपळवंडी) यांच्या वतीने साहित्यीक सहवास हा नाविन्यपुर्ण उपक्रम व काव्यमैफल नामवंत लेखक,कवी व रसिकांच्या उपस्थितीत नारायणगाव येथे संपन्न झाली.
“साहित्यीक सहवास” या उपक्रमाची सुरुवात शिवांजली साहित्यपीठाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी चाळक यांनी प्रास्तविकामधून केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवि व साहित्यीक जालिंदर डोंगरे होते. यावेळी उपस्थितांचे स्वागत रघुनाथ काकडे व रत्नप्रभा काकडे यांनी केले.

पहिल्या सत्राची सुरूवात नागपुरहुन आलेले ज्येष्ठ गीतगझलकार देविदास इंदापवार यांच्या “माझी साहित्यीक वाटचाल साहित्यसंवादाने झाली. यानंतर पुस्तकावर बोलु काही या सत्रात खोडद येथील जीएमआरटी येथील तंत्रज्ञ सुधिर फाकटकर लिखीत “अपोलो ११” या पुस्तकावर शिवांजली विद्या निकेतनचे विज्ञान शिक्षक मा.प्रशांत शेटे यांनी विस्तृत भाष्य केले.
यावेळी अपोलो १ अपोलो ११ या अवकाश मोहीमेबद्दल लेखकाने मांडलेल्या विवीध वैशिष्ट्यांचा मागोवा घेतला. यानंतर कवी संदिप वाघोले यांच्या “ती ची स्पंदने” या काव्यसंग्रहावर प्रा.जयसिंग गाडेकर यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी या काव्यसंग्रहात कवीने मांडलेल्या स्त्रीबद्दलच्या वेदना व संवेदनावर अतिश्य मार्मीक शब्दांत भाष्य केले.
या नंतरच्या सत्रात कवींच्या विविधांगी काव्यमैफिलीने रंगत आणली. या कवी संमेलनात देविदास इंदापवार, शिवाजी चाळक, पारु कडाळे, वसीम सय्यद, नवदिप आहेर, बाबासाहेब जाधव, रणजीत पवार, अनिल भांड, प्रा. गणेश सोनवणे, संदिप वाघोले, रवी काशिद, बासू सूरवसे, स्मिता विटे, मंगल लेंडे, प्रा वैशाली सावंत, अर्चना नेवकर, दिपक सोनवणे, फकीर आतार, सुनिल जगताप यांच्यासह वीस कवींनी कविता सादर केल्या.

या प्रसंगी विघ्नहर सहकारी साखर कारखाना कामगार युनियन उपाध्यक्ष बाळकृष्ण चाळक, संतु जेडगुले, निवृत्ती जुन्नरकर, प्रा.केशव बोरकर, अशोक खरात, अरुंधती हाडवळे, माधव लांडगे, संजय वाघ, साधना सैद आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब जाधव यांनी केले तर संदिप वाघोले यांनी आभार मानले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा