नरेंद्र दाभोलकर हत्या : ‘सनातन’शी संबंधित पाच जणांवर आरोप निश्चित करण्याचे न्यायालयाचे आदेश

30
पुणे, ८ सप्टेंबर २०२१: अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी पुण्यातील एका विशेष न्यायालयाने मंगळवारी सनातन संस्थेशी संबंधित सर्व पाच आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.  पुणे न्यायालयाने २०१३ च्या नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी आरोपींवर IPC कलम ३०२, १२० (b), ३४ तसेच UAPA च्या कलम १६ आणि ३ (२५), २७ (1), २७ (३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील सुनावणी आता १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. १५ सप्टेंबरला या प्रकरणातील आरोपींवर दोषारोप पत्र निश्चित केले जाणार आहे.
 यूएपीए अंतर्गत खटला चालवावा – सीबीआयची मागणी
 २०१३ मध्ये डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणात सीबीआयने विशेष न्यायालयाकडे बेकायदेशीर क्रिया (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत पाच आरोपींवर खटला चालवण्याची मागणी केली होती.  तपास संस्थेच्या मते, आरोपींनी दाभोलकरांची हत्या करून लोकांच्या एका वर्गात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील ओकांरेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. २०१४ मध्ये पुणे शहर पोलिसांकडून हे प्रकरण हाती घेणाऱ्या सीबीआयने आतापर्यंत पाच आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस आर नावंदर यांचे विशेष न्यायालय सध्या या प्रकरणाची कार्यवाही करत आहे. मंगळवारी न्यायालयाने म्हटले की, ते पाचही आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश देत आहेत.
न्यायालयाने म्हटले आहे की, डॉ.वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि विक्रम भावे या चार आरोपींविरोधात हत्येचा, हत्येचा कट रचण्याच्या आणि यूएपीए व शस्त्रास्त्र कायद्याच्या तरतुदींनुसार दोषारोप असतील. तसेच, न्यायालयाने हे देखील सांगितले की, पुरावे नष्ट केल्याबद्दल वकील संजीव पुनाळेकर यांच्यावर आरोप लावले जाणार आहेत. सीबीआयच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी युक्तिवाद केला.
सूर्यवंशी यांनी आरोपीविरोधात कलम १२०B (गुन्हेगारी कट), ३०२ (खून), शस्त्र कायद्यातील संबंधित कलमे आणि UAPA च्या कलम १६ (दहशतवादी कृत्यासाठी शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.  UAPA च्या कलम १५ ची व्याख्या समाजात किंवा समाजातील एका वर्गात दहशत निर्माण करणे आहे, असे ते म्हणाले.
 सध्याच्या प्रकरणात आमचा वाद असा आहे की बंदुकीचा वापर डॉ.दाभोलकरांच्या हत्येसाठी लोकांच्या एका वर्गात दहशत निर्माण करण्यासाठी केला गेला होता, म्हणून या प्रकरणात UAPA चे कलम १६ लागू केले जावे.  ते म्हणाले की, सीएबीला यूएपीएचे कलम १६ लागू करण्यासाठी राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा