पुणे, १५ जानेवारी २०२३ : नाशिक ‘आयटीआय’ला राज्यातील पहिली ‘मॉडेल आयटीआय’ बनविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, प्राचार्य, निरीक्षकांनी याचा पाठपुरावा करून त्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन राज्याचे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांनी केले.
नाशिक आयटीआय येथे ‘मॉडेल आयटीआय’ उभारण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली असून, त्याअंतर्गत विविध वर्कशॉपमध्ये ट्रिमिक्स पद्धतीचे फ्लोरिंग करण्यास सुरवात करण्यात आलेली आहे. या कामांची पहाणी काल संचालक दळवी यांनी केली. त्यानंतर श्री श्री रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व स्नायडर उद्योगाच्या माध्यमातून आयटीआय येथे घरगुती वायरिंगच्या प्रशिक्षणासाठी लागणारी प्रयोगशाळा उभारण्यात आली असून, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घरगुती वायरिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या प्रयोगशाळेचा प्रारंभ श्री. दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ट्रस्टतर्फे विजय हाके यांनी हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक उद्योगांची थेट डिलरशिप उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात राज्याचे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांच्या हस्ते ‘एचएएल’मध्ये ऑन जॉब ट्रेनिंग घेणार्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
राज्यातील नाशिकच्या या ‘मॉडेल आयटीआय’मध्ये ‘एरॉनॉटिकल स्ट्रक्चर अॅण्ड इक्विपमेंट फिटर’ हा नवीन ट्रेड सुरू करर्यात येत असून, या कामाचे प्रशिक्षण देण्यासाठी जर्मनीच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली असल्याचे दिगंबर दळवी यांनी सांगितले. या नव्या ट्रेडचा प्रारंभ नाशिक आयटीआयमधून केला जाणार असून, या माध्यमातून उच्चदर्जाची गुणवत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे श्री. दळवी यांनी सांगितले.
या कार्यक्रमात सहसंचालक प्रफुल्ल वाकडे, उपसंचालक मधुकर पाटील, आर. एस. मुंडासे, सहायक संचालक डी. जी. जाधव, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षण अधिकारी इंद्रजित काकड, प्रा. राजेश मानकर, ‘एचएएल’चे डीजीएम, श्री. सावळकर, उपप्राचार्य मोहन तेलंग, ‘आयएमसी’चे अध्यक्ष सुधीर पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आर. एस. मुंडासे, मोहन तेलंगी व श्री. सावळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
‘नाशिक आयटीआय’ हे ‘मॉडेल आयटीआय’ बनविण्यात येत आहे. विमान क्षेत्राच्या अभ्यासक्रमाचा पहिल्यांदा समावेश करण्यात आलेला आहे. ‘एचएएल’नेही या क्षेत्रात भरीव मदत करावी.
- दिगंबर दळवी, संचालक, राज्य व्यवसाय शिक्षण-प्रशिक्षण संचालनालय
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील