नटसम्राट डॉ.श्रीराम लागू यांचे पुण्यात निधन

पुणे: पुणे: ज्येष्ठ अभिनेते, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांचं पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी दिलेलं योगदान अतिशय मोठं होतं. रंगभूमीवरही त्यांनी केलेली अनेक नाटकं प्रचंड गाजली होती.
त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर, इ.स. १९२७ झाला होता. हे मराठी व हिंदी नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील अभिनेहोते व दिग्दर्शक होते. देवाला रिटायर करा अशी आरोळी ठोकत त्यांनी पुरोगामी आणि त्यांच्या मते तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला होता. त्यांचे हे विधान वादग्रस्त ठरले होते.
वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली व नंतर भालबा केळकर यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यांसमवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली. १९५० च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात ५ वर्षे काम केले व नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. १९६० च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते. शेवटी १९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर सिंहासन, पिंजरा, मुक्ता सारख्या अनेक चित्रपटांतून कामही केले. त्यांच्या पत्‍नी दीपा लागू या ख्यातनाम नाट्यअभिनेत्री होत्या.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा