नवी दिल्ली: एकमेकांच्या आकंठ प्रेमात पडलेली जोडपी कित्येकदा आणाभाका घेतात. एकमेकांची साथ अगदी सात जन्मांपर्यंत देऊ वगैरे शपथा घेतल्या जातात.
परंतु, कधीकधी या शपथा सात जन्म तर सोडाच पण सात महिनेही टिकत नाहीत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे.
उत्तर प्रदेशमधील मैनपुरी जनपदमध्ये एक अजब घटना घडली आहे. प्रेमाला असलेला घरच्यांचा विरोध पत्करून विवाह करणाऱ्या जोडप्यातील पत्नी फक्त १३ दिवसात फरार झाली आहे.
याबाबत अधिक माहिती घेतली असता, या तरुणीचे एका तरुणावर प्रेम होते. पण, घरच्यांना हे नातं मान्य नव्हते. तरीही घरच्यांच्या विरोधात जाऊन तिने १६ नोव्हेंबर रोजी पळून जाऊन लग्न केले. पण, आयुष्यभराच्या बंधनात बांधलेली ही तरुणी अवघे १३ दिवसच सासरी टिकू शकली.
सगळं काही सुरळीत सुरू असताना सासरच्यांना गुंगारा देऊन ही तरुणी पळून गेली.
दोन दिवस शोध घेऊनही ती न सापडल्याने तिच्या नवऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली. तेव्हा काही ग्रामस्थांनी ती भलत्याच तरुणासोबत पळून गेल्याचं त्याला सांगितले. सध्या पोलीस या तरुणीचा शोध घेत आहेत.