मुंबई, २४ सप्टेंबर २०२० : येत्या १७ ते २५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी हे सण साजरे होणार आहेत. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सण साधेपणाने साजरे करावेत, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. गणपती उत्सवादरम्यान ज्या प्रकारे सहकार्य केलं त्याचप्रकारे या सणामध्ये देखील सर्वांनी सहकार्य करावं, जेणेकरुन कोरोनाचा प्रसार थांबवता येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
गणपती उत्सव साजरा करण्याबाबत जसं परिपत्रक शासनानं काढलं होतं त्याचप्रमाणे या सणाबाबत देखील लवकरच मार्गदर्शक परिपत्रक काढण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान राज्यात काल कोविड चे १९ हजार ४७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर याच काळात २१ हजार २९ नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यातले एकंदर ९ लाख ५६ हजार ३० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.६५ टक्के एवढे झाले आहे. राज्यभरात सध्या २ लाख ७३ हजार ४७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
काल राज्यात ४७९ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. या आजारामुळे आता पर्यंत राज्यातल्या ३३ हजार ८८६ जणांचा बळी गेला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी