नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस वाहतूक शाखेनं शहरातील प्रमुख मंदिरांच्या परिसरात वाहतुकीत महत्त्वाचे बदल लागू केले आहेत. सोमवार, २२ सप्टेंबरपासून हे बदल लागू झाले आहेत. विशेषतः श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, श्री चतुःश्रृंगी मंदिर, भवानी माता मंदिर आणि सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिर परिसरात वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.
तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसरात, अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक हा रस्ता तसेच लक्ष्मी रस्त्यावर गणपती चौक ते मंदिरापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. भाविकांनी आपली वाहनं नदीपात्रातील रस्ता किंवा मंडईतील वाहनतळावर पार्क करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
चतुःश्रृंगी मंदिर परिसरात, गर्दी वाढल्यास सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक वेताळबाबा चौक आणि दीप बंगला चौक मार्गे वळवण्यात येईल.
महालक्ष्मी मंदिर (सारसबाग परिसरात), श्रीसूक्त पठणामुळे मंगळवारी सकाळी ५ ते ७ या वेळेत वाहतुकीत बदल केले जातील. स्वारगेटकडून सारसबागेकडे जाणारा मार्ग या काळात बंद ठेवण्यात येईल.
वाहनधारकांनी आणि भाविकांनी या बदलांची नोंद घेऊन सहकार्य करावं, असं आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे













































