पुरंदर तालुक्यातील नाझरे धरण भरले

पुरंदर, दि. १५ ऑगस्ट २०२०: पुरंदर तालुक्यातील मध्यम प्रकल्प असलेले नाझरे धरण आज दिनांक १५ ऑगस्ट रोजी सायंकाळ पर्यंत ९५ टक्के भरले असुन मध्यरात्री पर्यंत १०० टक्के भरणार आहे. उद्या सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान या धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडून पाणी कऱ्हा नदी पात्रात येणार असल्याचे माहिती शाखाधिकारी एस. जी. चौलंग यांनी दिली आहे.

पुरंदर तालुक्यातील महत्त्वाच्या धरणांमध्ये प्रथम क्रमांकाचे असलेले म्हणजे नाझरे धरण. यालाच मल्हार सागर या नावाने सुद्धा ओळखले जाते. या धरणामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. पुरंदरच्या पश्चिम भागात म्हणजेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या संततधार पावसामुळे नाझरे धरण ९५ टक्के भरले आहे. ७८८ दशलक्ष घनपफुट क्षमतेचे हे धरण असुन धरणावर जेजूरी शहर, जेजुरीऔद्योगिक केंद्र, पुरंदर बारामती तालुक्यातील ५० गावांच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. या धरणाला स्वयंचलित दरवाजे असल्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त पाणी आल्यास या धरणाच्या सांडव्याचे दरवाजे आपोआप उघडतात.

यानंतर, हे पाणी कऱ्हा नदीतून बारामती आणि तिथून पुढे नीरा नदीला जात असते. गेल्यावर्षी सासवडजवळ नारायणपूर, गराडे या भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे कऱ्हा नदीला मोठा पूर आला होता. सासवड पासून ते बारामती पर्यंत शेतकऱ्यांच्या जनावरांचे नुकसान झाले होते. त्याचबरोबर नदीवरील बंधारे व पुलांचे सुद्धा मोठे नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर आज पाटबंधारे विभागाकडून धरणाखालील गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गावातील सरपंच यांनी या गावातील लोकांना सावध करून योग्य ती व्यवस्था करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर नदीकाठच्या लोकांनी आपली जनावरे, इलेक्ट्रीक मोटर इत्यादी साहित्य नदीपात्रापासून दूर ठेवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

 उद्या सकाळी आठ ते दहा यादरम्यान धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले जातील असा अंदाज वर्तवला जात असला तरी, रात्रीत जर पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस झाला तर रात्रीसुद्धा धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडू शकतात त्यामुळे लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा