मुंबई, २४ जून २०२१: नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने (NCB) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला बेड्या ठोकल्या आहेत. एनसीबीची ही एक मोठी कारवाई आहे. मुंबईतील ड्रग्ज प्रकरणी एनसीबी इक्बाल कासकरची चौकशी करणार आहे. काश्मीर येथून मोठ्या प्रमाणात हशीश मुंबई आणून त्याची विक्री होत होती. या रॅकेटवर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने कारवाई केली आहे.
एनसीबीला (NCB) यापुर्वी ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे मिळालेले आहेत. प्रकरणात दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरचा हात असल्याची कुणकुण तपास यंत्रणांना लागली होती. चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर सखोल चौकशीअंती इक्बाल कासकरला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
इक्बाल कासकरवर कोणता आरोप?
इक्बाल कासकरवर एनसीबीनं जम्मू काश्मीरमधून पंजाबमध्ये २५ किलो ड्रग्ज पुरवल्याचा आरोप आहे. हे ड्रग्ज मुंबईत देखील विकण्यात आलं होतं. एनसीबीनं काश्मीरमधून होणाऱ्या ड्रग्ज तस्करीचा तपास केला असता या कारवाईतून या प्रकरणात गँगस्टर दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर याच संबंध असल्याचं उघड झालं. आता इकबाल कासकर याच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. इकबाल कासकर याचं अटक वॉरंट कोर्टाकडून मिळवल्यानंतर त्याची चौकशी केली जाईल.
मुंबईत गेल्या दोन दिवसांत एनसीबी अधिकाऱ्यांनी मुंबईत मोठी करावाई केल्या आहेत. या कारवाईत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या या ड्रग्जची किंमत कोट्यावधी रुपयांत असल्याची माहिती समोर आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे