रत्नागिरी, १६ नोव्हेंबर २०२३ : महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी कार्यालयाकडून १५ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या काळात राष्ट्रीय स्तरावरील ‘कोकण शौर्य’
हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. स्वच्छ कोकण, सुरक्षित कोकण अणि सुंदर कोकण हे ब्रीद घेऊन, NCC चे १० दिवसांचे ‘कोकण शौर्य’ शिबिर पार पडत आहे. या शिबिरासाठी राज्य भरातील एकूण ६० छात्रांची निवड झाली आहे. रत्नागिरी ते रनपार, पावस, पूर्णगड, आंबोळगड, विजयदूर्ग आणि देवगड, परत याच मार्गाने रत्नागिरी असा २३५ किलोमीटरचा सागरी प्रवास सहभागी शिबिरार्थी करणार आहेत.
शिबिरा दरम्यान स्वच्छता व सुरक्षित तटाबाबत पथनाट्य, कविता यांच्या माध्यमातून बाजारपेठ, शाळांमधून जनजागृती करण्यात येणार आहे. या शिबिराचा एन.सी.सी. चे डायरेक्टर, ब्रिगेडियर व्ही.एन.कुलकर्णी यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. ब्रिगेडियर कुलकर्णी यांनी ध्वज दाखवून शिबिरार्थींना मार्गस्थ केले. या शिबिराद्वारे तटीय स्वच्छतेबरोबरच समुद्रामधील स्वच्छता विशेषत: प्लॅस्टिक निर्मूलन याबाबत जनजागृतीवर भर दिला जाणार आहे.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी, कमांडर के. राजेश कुमार, कार्यकारी अधिकारी अंकित रवी, कोस्टगार्डचे अधिकारी आदी उपस्थित होते. महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसीने अभियान राबवून कोकणातील समुद्र किनारे स्वच्छ करण्याचे काम केले आहे, त्याबद्दल त्यांचे ब्रिगेडियर व्ही.एन.कुलकर्णी यांनी आपल्या भाषणातून कौतुक केले. तसेच ‘कोकण शौर्य’ शिबिरात निवड झालेल्या शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या.
न्युज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर