गावठाण जमिनीवरील अतिक्रमण विरोधात राष्ट्रवादीचा रास्ता रोको, नंदूरबार जिल्ह्यातील पिमटी गावठाण येथिल प्रकरण

नंदूरबार, २ ऑगस्ट २०२३: अक्कलबुवा तालुक्यातील पिमटी येथील गावठाण जमिनीवर अतिक्रमण करुन बेकायदेशीर रस्ता कायम स्वरुपी बंद करण्यात आला. यावरून संतप्त ग्रामस्थ, धडगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अक्कलबुवा येथे रास्तारोको आणि थाळीनाद आंदोलन करण्यात आले आहे.

पिमटी येथील रस्ता बंद झाल्याने आदिवासी बांधव सोयीसुविधा पासून वंचित राहत आहेत. येथील नागरिकांना अनेक वर्षांपासून या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अक्कलबुवा येथे पंचायत समितीसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक जिल्हाध्यक्ष नितीन जगताप, धडगाव तालुकाध्यक्ष राहुल पावरा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी आंदोलन स्थळी येऊन अतिक्रमण धारकांवर दोन दिवसांत कारवाई करणार असल्याचे लेखी स्वरूपात आश्वासन दिले. याप्रसंगी माजी तालुकाध्यक्ष निलेश पडवी, बाळासाहेब मोरे, हंसराज पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा