पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे कोविड -१९ मुळे निधन

पिंपरी चिंचवड, दि. ४ जुलै २०२०: कोविड -१९ चा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्यात गेल्या चोवीस तासांमध्ये याची विक्रमी नोंद देशांमध्ये नोंदवली गेली आहे. कोविड -१९ चा प्रादुर्भाव नेत्यांना देखील आता होण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता पिंपरी-चिंचवडमधील एका नगरसेवकाचा यामुळे मृत्यू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांचा कोविड -१९ मुळे मृत्यू झाला आहे. ते ५४ वर्षाचे होते.

दत्ता साने यांच्यावर काही दिवसांपासून भोसरी मधील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या निकटवर्तींनी सांगितले की, सुरुवातीला त्यांना कोविड -१९ ची सौम्य लक्षणे दिसण्यास सुरुवात झाली होती. मात्र नंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. श्वसनाला त्रास होत असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाल्यामुळे येथील परिसरात शोककळा पसरली आहे.

लॉकडाऊनच्या काळात गरजूंना मदत करण्यासाठी व प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी दत्ता साने हे सातत्याने कार्यरत होते. याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. साने यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी तत्पर असायचे. नागरिकांना होत असलेल्या कचऱ्याच्या समस्यांमुळे त्यांनी एकदा चक्क महानगरपालिकेच्या आवारात कचरा आणून टाकला होता. विशेष म्हणजे आपल्या कार्यातून ते महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधींचे आणि अधिकाऱ्यांचे नेहमीच लक्ष वेधून घेत असे. असे देखील सांगितले जाते की अजित पवारांचे ते निकटवर्तीय होते. चिखली येथून ते तीन वेळेस नगरसेवक म्हणून निवडून आले होते. महानगर पालिकेच्या विरोधी पक्ष नेते पदाची धुरा सांभाळताना त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा