पुणे, ११ जानेवारी २०२३ :राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज सकाळी त्यांच्या घरावर ईडीने धाड टाकली. सकाळी ६ वाजल्यापासून ही कारवाई सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीकडून सध्या हसन मुश्रीफ यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्या कागल आणि पुण्यातील घरावर छापे टाकण्यात आले आहेत. पुण्यात ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या चंद्रकांत गायकवाड यांच्यावर छापे टाकले आहेत. तर कोरेगाव पार्क आणि गणेशखिंड रोडवर देखील छापेमारी सुरू आहे. चंद्रकांत गायकवाड हे मुश्रीफांच्या भागीदार आहे.
अप्पासाहेब नलवडे साखर कारखानाप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. कारखानातल्या १०० कोटी घोटाळ्याचा आरोप मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
- समर्थकांची मुश्रीफ यांच्या घरासमोर गर्दी
मुश्रीफ यांच्या घरावर छापे टाकले जात असल्याची माहिती कळताच कागलमध्ये समर्थकांनी मुश्रीफ यांच्या घरासमोर गर्दी केली असून पोलीस बंदोबस्त तैनात आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. तर ही कारवाई सुडबुद्धीने केल्याचा आरोपही केला आहे.
दरम्यान, आज दुपारी मुश्रीफ पत्रकार परिषद घेणार आहे.
यापूर्वीही जुलै २०१९ मध्ये हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आणि साखर कारखान्यावर छापेमारी झाली होती. आयकर विभागाने केवळ कोल्हापुरातच नव्हे, तर हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील घरीही छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांचा मुलगा साजिद मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.