Sharad Pawar emotional tribute to Krishnarao Bhegade: राज्याच्या राजकारणातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी (गुरुवार, ३ जुलै) तळेगाव दाभाडे येथील दिवंगत माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवारही उपस्थित होत्या.
नुकतेच निधन झालेले माजी आमदार कृष्णराव भेगडे हे शरद पवारांचे केवळ राजकीय सहकारी नव्हते, तर एक अत्यंत जवळचे मित्र होते. भेगडे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करताना आणि कुटुंबीयांशी संवाद साधताना, आयुष्यभर सोबत दिलेल्या या ज्येष्ठ सहकाऱ्याच्या आठवणींनी शरद पवारांचे डोळे पाणावले. “कृष्णराव भेगडे केवळ सहकारी नव्हते, तर ते माझे जिवाभावाचे मित्र होते,” असे म्हणताना त्यांच्या भावना अनावर झाल्या.

३० जून रोजी कृष्णराव भेगडे यांचे निधन झाले होते. भेगडे यांनी आपल्यावर नेहमीच अढळ विश्वास ठेवला होता, आणि हाच विश्वास आता त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहून जपायचा आहे, असे पवार यांनी या वेळी सांगितले. संकटाच्या काळात भेगडे नेहमीच पाठीशी उभे राहिले होते, या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
या भावनिक भेटीदरम्यान, पवार यांनी भेगडे यांच्या कन्या राजश्री म्हस्के, जावई उद्योजक राजेश म्हस्के, व्याही राजाराम म्हस्के, नाती रवीना व रिद्धी, पुतण्या आनंद भेगडे, सून अनिता भेगडे आणि बहीण सीताबाई वाजे यांच्याशी संवाद साधला. या प्रसंगी माजी मंत्री मदन बाफना, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांच्यासह देवदत्त निकम, बबनराव भेगडे, बापूसाहेब भेगडे, रामदास काकडे, गणेश खांडगे, नंदकुमार शेलार, दत्तात्रय पडवळ, अंकुश भेगडे, अर्चना घारे, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, आयुब सिकिलकर, संदीप काकडे, अशोक काकडे, सत्यजित वाढोकर, प्रतीक वाढोकर, आणि राजेंद्र घोजगे यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते. ही भेट केवळ सांत्वनाची नव्हती, तर एका निष्ठावान मित्राला आणि सहकाऱ्याला वाहिलेली आदरांजली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे