मुंबई, १६ जुलै २०२३ : अजित पवार यांनी राजकीय भूकंप घडवत राष्ट्रवादी मधील ४० आमदारांचा गट घेऊन ते बाहेर पडले. राष्ट्रवादीतील फुटीला १५ दिवसही उलटले नाही तोच महाराष्ट्रातील राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवाचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील, धर्मराव बाबा आत्राम, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ यांच्यासह सर्वच मोठे नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत. शरद पवार हे मंत्रालयासमोरीलच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आहेत. तेथेच हे मंत्री पवारांना भेटायला गेले आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच हे मंत्री शरद पवार यांना भेटायला गेले आहे. विशेष म्हणजे उद्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वीच हे नेते शरद पवार यांना भेटायला गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्री आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या भेटीत बाहेर पडलेल्या गटाने राष्ट्रवादी का सोडाली याची कारणमीमांसा करत पुढील काळातील वाटचालीसाठी शरद पवार यांचा सल्लाही राष्ट्रवादीचे मंत्री घेतील असे बोलले जात आहे. त्यामुळे शरद पवार काय भूमिका घेणार आणि काय सल्ला देणार याकडे सर्वांचे लक्षा लगाले आहे.आज या मंत्र्यांसोबत अजित पवारही आले आहेत.अजित पवार हे परवाच शरद पवार यांच्या घरी सिल्वर ओकवर गेले होते. त्यांची काकू प्रतिभा पवार या आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी अजित पवार गेले होते. अजितदादानंतर आता राष्ट्रवादीचे मंत्रीही शरद पवार यांना भेटायला गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर