राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे कोरोनाने निधन, सरकोली येथे होणार अंत्यसंस्कार

14

पुणे, २८ नोव्हेंबर २०२०: राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. भालके यांना ३० ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना रूबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु होते. चार दिवसांत बरे होऊन ते पुन्हा मतदारसंघांमध्ये फिरू लागले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा त्यांना त्रास होऊ लागल्याने, पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. आमदार भारत भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुबी हॉल रुग्णालयात गेले होते. यानंतर प्रकृती चिंताजनक झाल्याने, तिथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर शुक्रवारी रात्री अकरा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

भारत भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते. मात्र तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. १९९२ साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. २००२ पासून त्यांना या कारखान्याच्या अध्यक्षपदावर आजपर्यंत कायम वर्चस्व ठेवले आहे.

सरकोली येथे होणार अंत्यसंस्कार

भारत भालके यांचं पार्थिव पुण्यावरुन पंढरपूरकडे रवाना झालं आहे. पंढरपुरातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर पार्थिव दाखल झाल्यानंतर, तिथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर पार्थिव भालकेंचं मूळगाव सरकोली इथे नेण्यात येईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे