राष्ट्रवादीने प्रसिद्ध केले कोश्यारींचे प्रगतिपुस्तक; दिला ‘हा’ शेरा

3

मुंबई, १७ फेब्रुवारी २०२३ : महाराष्ट्र राज्याचे मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची कारकिर्द चांगलीच वादग्रस्त राहिली होती. महापुरूषांचा अवमान केल्या प्रकरणी ते विरोधी पक्षांच्या निशाण्यावर होते. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते अडचणीत सापडले होते. त्यामुळे राष्ट्रवादीसह सर्वच विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दरम्यान, सगळीकडून होणार्‍या टीकेमुळे राज्यपालांनी स्वेच्छेने दिलेला राजीनामा मंजूर झाला आहे. मात्र कोश्यारी यांना जाता जाता राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलाच टोला लगावला आहे. भगतसिंह कोश्यारी यांची एक उपहासात्मक मार्कशीट तयार करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीने हे पत्र व प्रगतिपुस्तक भगतसिंग कोश्यारी आणि महाराष्ट्र भाजपला टॅग केले आहे. अधोगतीपुस्तक असे नाव दिलेल्या पुस्तकात राज्यपालांची मार्क, त्यांचा नंबर, तसेच त्यांची तुकडी अशी शैक्षणिक माहिती देण्यात आली आहे.

या पुस्तकात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तुकडी ‘ढ’ असल्याचे मार्कशीटवर नमूद करण्यात आले आहे. तर हजेरी क्रमांक ४२* असे दाखवण्यात आले आहे. इतिहास विषयात भोपळा, भूगोलात ३५, नागरिक शास्त्रात १७, सामान्य ज्ञानात ३४ तर कला विषयात त्यांना १०० पैकी शंभर मार्क देण्यात आले आहेत.

राज्यपालांनी महाराष्ट्रातील इतिहास पुरुषांवर केलेल्या भाष्यांवरून त्यांना इतिहासात ०० गुण देण्यात आले. व्हॉट्सअपवर व्हायरल करण्यात आलेल्या या मार्कशीटमध्ये शेराही देण्यात आलाय. सदर विद्यार्थ्याीच बौद्धिक क्षमता पाहता पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. या विद्यार्थ्याची वर्तणूक पाहता, याची सुरुवात बालवाडीपासूनच सुरु करणे योग्य राहील, अशा शब्दात डिवचण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP) ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आलेल्या संदेशात एक पत्रही आहे. सदर शाळेच्या मुख्याध्यापकांनी लिहिलेले हे पत्र असल्याचे अत्यंत खुमासदार पद्धतीने यात दाखवण्यात आले आहे.

आमच्या शाळेतील भगतसिंह कोश्यारी नामक विद्यार्थ्याला तत्काळ शाळेतून कमी करण्यात आले आहे. सदरहू विद्यार्थ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे तसेच विद्यार्थ्याने सुधारणेचे कोणतेही चिन्ह न दाखवल्याने अखेर त्यांची गच्छंती करण्यात येत आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा