राष्ट्रवादीचा अजित पवार गट एनडीएच्या बैठकीत सहभागी होणार, अजित पवार स्वत: बैठकीला हजर राहणार

नाशिक, १५ जुलै २०२३ : आजवर पुरोगामी विचारांची कास धरलेल्या अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतला आहे. कायम काँग्रेस आणि संयुक्त पुरोगामी आघाडीसोबत राहिलेल्या अजित पवार गटाने (राष्ट्रवादी) आता वेगळा मार्ग पत्करला आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या एका गटाने भाजपसोबत हात मिळवणी केली आहे. या गटाने भाजप सोबत राज्यातील सत्तेतही सहभाग घेतला आहे. आता हाच गट भाजपच्या नेतृत्वातील एनडीएतही सामील होणार आहे. एनडीएची पुढच्या आठवड्यात दिल्लीत बैठक होणार असून राष्ट्रवादीचा हा गट एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

मंगळवारी १८ जुलै रोजी एनडीएची बैठक होत आहे. या बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला जाणार आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलही असणार आहेत. स्वत: अजित पवार यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून राज्यातील समस्या त्यांना सांगणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर पहिल्यांदाच अजित पवार नाशिकला आले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, केंद्रात नरेंद्र मोदी यांचा करिश्मा असलेले नेतृत्व आहे. मी सकाळी येत असताना, अनेक लोक मला भेटले. वंदे भारत ही ट्रेन चांगली असल्याचे प्रवाशांनी सांगितले, असे अजित पवार म्हणाले. उद्या जर विरोधकांनी चहा पानावर बहिष्कार टाकला नाही, तर आम्ही सहकार्य करू. जो काम करतो, त्याच्याच तक्रारी असतात. काही तक्रारी असतील, तर आम्ही सोडवू. एखादे काम चांगले असेल, तर मी त्याच्यावर टीका करत नाही. शासन आपल्या दारी कार्यक्रमावर मी कधीच टीका केली नाही. नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे, असेही ते म्हणाले.

विरोधी पक्षाच्या नेत्याच्या निवडीबाबतही त्यांनी भाष्य केले. विरोधी पक्षनेत्याच्या निवडीबाबत विधानससभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर बघतील ना. विरोधकांकडून पत्र तरी आले पाहिजे. ती निवड अधिवेशनाच्या काळात करतात. अधिवेशन १७ तारखेला सुरू होणार आहे. तीन आठवडे अधिवेशन चालणार आहे. विरोधी पक्षनेता निवडण्याचा संपूर्ण अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.

येवल्यात शरद पवार यांची सभा झाली आहे. त्यानंतर खाते वाटप होते. आता अधिवेशन आहे. ते झाल्यावर आम्ही सभा घेऊ. तुम्ही काळजी करू नका. आम्ही योग्य निर्णय घेऊ. उद्या चहापानाचा कार्यक्रम आहे. उद्या मंत्र्यांची १० वाजता मिटिंग आहे. आदिती तटकरे, संजय बनसोडे,अनिल पाटील हे नवीन आहेत. आम्ही बाकीचे सहाजण अनुभवी आहोत. प्रश्नाची उत्तरे देणे अवघड आहे असे नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी समान नागरी कायद्यावरही आपले मत व्यक्त केले. समान नागरी कायद्याचा ड्राफ्ट पाहिल्यावर आम्ही आमची भूमिका मांडू. कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही, अशी आमची भूमिका आहे. ३७० कलम काढले, चांगली गोष्ट झाली. समान नागरी कायद्याचा ड्राफ्ट जर संपूर्ण देशाच्या भल्याचा असेल, तर विचार करू, असे अजित पवार यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा