प्रत्येक शाळेत ‘पुस्तक दोस्ती वाचन कट्टा’ काळाची गरज : गझलकार तथा निवृत्त सह पोलिस आयुक्त गंगाधर पाटील

प्रा. सचिन सावरकरांतर्फे जनता हायस्कूलला पुस्तक पेटी व १५० पुस्तके भेट; १५०० विद्यार्थ्यांचा वाचनाचा संकल्प

देवळी (जि. वर्धा), ३ जानेवारी २०२२ : नवीन पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी अविरत धडपड करणाऱ्या ‘पुस्तक दोस्ती अभियान’तर्फे जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ‘पुस्तक दोस्ती वाचन कट्टा’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सोमवारी (ता. दोन) उद्घाटन करून विद्यार्थ्यांनी उत्तम पुस्तके वाचण्याचा संकल्प मनाशी बांधून नव्या वर्षाचे उत्साहात स्वागत केले.

या अभिनव उपक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रख्यात गझलकार निवृत्त सह पोलिस आयुक्त गंगाधर पाटील, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य वनिता मदनकर, तर अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या संध्या भगत, ‘पुस्तक दोस्ती चळवळीचे प्रणे’ते प्रा. सचिन सावरकर यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते ग्रंथपूजनाने झाली. याप्रसंगी पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत सहज उपलब्ध व्हावीत, यासाठी ‘पुस्तक दोस्ती अभियान’तर्फे शाळेला ‘पुस्तक दोस्ती वाचन कट्टा’ या उपक्रमाअंतर्गत पुस्तक पेटी व १५० पुस्तकांचा संच भेट देण्यात आला.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना गझलकार गंगाधर पाटील म्हणाले, की कोवळ्या वयातील तरुण मुलं मोबाईल, इंटरनेटच्या आहारी गेली आहेत. या महाजालाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असताना हे अरिष्ट रोखण्यासाठी, मुलांचे वाचनप्रेम वाढावे म्हणून ‘पुस्तक दोस्ती वाचन कट्टा’ हा उपक्रम प्रत्येक शाळेत राबवून नवीन पिढीला वाचविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस शिपाई ते गझलकार हा प्रवास आपल्या अत्यंत हृदयस्पर्शी भावनांमधून उलगडून दाखविला.

सामाजिक कार्यकर्त्या संदर्भात यांनी अनेक महापुरुषांचे दाखले देत विद्यार्थ्यांच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणणारी ‘पुस्तक दोस्ती’ ही चळवळ असून, शाळेत राबविला जाणारा महाराष्ट्रातील हा पहिलाच ‘पुस्तक दोस्ती वाचन कट्टा’ अभिनव प्रयोग असल्याचे सांगितले.

याप्रसंगी ‘पुस्तक दोस्ती वाचन चळवळी’चे प्रणेते प्रा. सावरकर यांनी ‘पुस्तक दोस्ती वाचन कट्टा’ या उपक्रमाचे स्वरूप समजावून सांगताना पुस्तकांबरोबरच विद्यार्थ्याला एक वही दिली जाते. पुस्तक वाचल्यावर पुस्तकासंबंधीचे आपले विचार वहीत लिहून ठेवायचे आणि आपल्या शिक्षकांना दाखवायचे. शिक्षक ते वाचून विद्यार्थ्याला पुस्तकातील अंतरंग समजावून सांगतील.

आपल्या अध्यक्षीय भाषणातून कॉलेजच्या प्राचार्या वनिता मदनकर यांनी वाचन हा संस्कार असून, तो रुजविण्याचा ध्यास ‘पुस्तक दोस्ती अभियान’ने घेतला असून, शाळेला मिळालेली पुस्तके हा विद्यार्थ्यांसाठी अनमोल ठेवा असल्याचे सांगितले.

यावेळी गझलकार गंगाधर पाटील व संध्या भगत यांचा शाळेच्या वतीने शाल व पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया जाधव यांनी केले, तर रूपाली घोडे यांनी आभार मानले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा