नवी दिल्ली, 26 जानेवारी 2022: टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणारा स्टार खेळाडू नीरज चोप्रा याला आता परम विशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात येणार आहे. एकूण 384 जणांना शौर्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. याच यादीत नीरज चोप्रालाही स्थान मिळालं आहे.
नीरज चोप्राचा विशेष सन्मान
73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते 384 जणांना शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती देण्यात आलीय. यामध्ये 12 शौर्य चक्र, 29 परम विशिष्ट सेवा पदकं, 4 उत्तम युद्ध सेवा पदकं, 53 अति विशिष्ट सेवा पदकं, 13 युद्ध सेवा पदकांचा समावेश आहे. याशिवाय 122 विशिष्ट सेवा पदक, 81 सेना पदक (शौर्य), 2 वायु सेना पदक, 40 सेना पदक, 8 नौसेना पदक, 14 वायु सेना पदक (कर्तव्य भक्ती) यांचा समावेश आहे.
बातमी अशी आहे की, यावेळी 26 जानेवारीच्या परेडमध्ये हरियाणाची झांकी खूप खास बनवण्यात आलीय. नीरज चोप्राची लाइफ साइज प्रतिकृतीही त्या झांकीमध्ये दिसेल. राज्याच्या माहिती, जनसंपर्क आणि भाषा विभागाच्या संचालनालयाने शनिवारी ही माहिती दिली. हरियाणा राजपथ येथे ऑलिम्पिक वीरांच्या पराक्रमाचे प्रदर्शन करण्याची तयारी करत असताना 10 ऑलिंपियन हरियाणाच्या झांकीचा एक भाग असतील.
नीरज चोप्राची पुढील तयारी
तसं, नीरज चोप्रानं यूएसएमध्ये प्रशिक्षण सुरू केलं आहे कारण तो पुढील व्यस्त हंगामाची तयारी करत आहे. नीरज वर्ल्ड चॅम्पियनशिप, डायमंड लीगमध्ये भाग घेणार आहे. याशिवाय नीरज 2022 च्या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेतेपद राखण्याचा प्रयत्न करंल.
26 जानेवारीच्या कार्यक्रमाबद्दल बोलायचं तर आज सकाळी 10.30 वाजता परेड सुरू होऊ शकते. पूर्वी ही परेड सकाळी 10 वाजता सुरू व्हायची. मात्र यंदा अनेक बदल पाहायला मिळत आहेत. यावेळी एरियल शोवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे. हवाई दलाच्या सामर्थ्याबद्दल संपूर्ण देशाला वेगळेपण जाणवणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे