नापाक योजना पुन्हा अयशस्वी, सुरक्षा दलांनी बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांपासून केली ५ तरुणांची सुटका

जम्मू-काश्मीर, २४ जानेवारी २०२३ : जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या मोठ्या कारवायांचा खुलासा करून पोलिसांनी त्यांचा डाव हाणून पाडला आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील पट्टणमध्ये आज मोठी कारवाई करीत सुरक्षा दलांनी किशोरांसह ५ तरुणांची दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटका केली. सुरक्षा दलांनी सर्व तरुणांना आपल्या ताब्यात घेतले आणि नंतर समुपदेशन केल्यानंतर त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले.

हे दहशतवादी तरुणांची दिशाभूल करून त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्याचे प्रलोभन देत होते. लष्करासह बारामुल्ला पोलिसांना दहशतवादी गटात सामील होण्यापासून ५ तरुणांना वाचविण्यात यश आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील दहशतवादी बॉसकडून काही तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याची माहिती मिळाली आहे.

माहिती मिळताच सुरक्षा दलांनी प्रथम या तरुणांचा शोध घेतला आणि त्यांच्या पालकांच्या मदतीने त्यांची सतत चौकशी केली. दहशतवादी संघटनांमध्ये भरती होण्यासाठी हे युवक सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी ऑपरेटर्सच्या संपर्कात असल्याचे त्यांच्या खुलाशातून स्पष्ट झाले आहे. दहशतवादी या मुलांचे मन कट्टरपंथी बनविण्याचा प्रयत्न करीत होते; परंतु या सर्व मुलांना आता योग्य सल्लामसलत करून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा