Neglected Open Gym in Ravet: खासदार निधीतून दहा लाख रुपये खर्चून रावेत येथील म्हस्के वस्तीमार्गावरील पदपथावर उभारलेली ‘ओपन जिम’ (खुली व्यायामशाळा) अवघ्या काही महिन्यांतच मोडकळीस आली आहे. देखभालीअभावी साहित्याची मोडतोड झाली असून, महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, नागरिकांनी या जिमचा वापरच केला नसल्याने, लाखो रुपयांचा निधी अक्षरशः धुळीला मिळाला आहे.
म्हस्के मार्गावरील गोखले रोड परिसरात अनेक टोलेजंग इमारती आणि दुकाने आहेत. नागरिकांच्या आरोग्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून ही अत्याधुनिक खुली व्यायामशाळा उभारण्यात आली होती. मात्र, ही जिम अनावश्यक ठिकाणी उभारल्याने नागरिकांनी तिच्याकडे पाठ फिरवली. परिणामी, अवघ्या काही दिवसांतच तेथील साहित्याची तोडफोड झाली. सध्या या जागेवर तुटलेले बेंच, खिळखिळे झालेले व्यायाम साहित्य आणि सर्वत्र पडलेला राडारोडा याशिवाय काहीही शिल्लक राहिलेले नाही.
सामाजिक कार्यकर्ते राजू म्हस्के यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “या अतिवेगाने विकसित होणाऱ्या भागात उभारलेल्या व्यायामशाळेची दुरवस्था झाली आहे.साहित्याला ग्रीसिंग, ऑइलिंग करणे आवश्यक होते. नट-बोल्ट निघाले तर ते बसवण्याकडे दुर्लक्ष झाल्याने साहित्य अधिकच खराब झाले आहे.”
या जिममधील अनेक साहित्य चोरीला जाण्याच्या मार्गावर आहे, तर काही भाग आधीच चोरीला गेले आहेत. जिमचा राडारोडा रस्त्यावर पडल्याने पदपथही वापराविना झाला आहे, ज्यामुळे नागरिकांना चालताना त्रास होत असून, किरकोळ अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षासोबतच नागरिकांच्या उदासीनतेमुळे सरकारी निधीची उधळपट्टी झाल्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे













































