Neha Byadwal UPSC journey: ‘अपयश ही यशाची पहिली पायरी असते’, असं म्हणतात मात्र हेच अपयश वारंवार येत राहीलं की लढण्याची ताकद आणि जिद्द ही आपोआपच कमी होत जाते.अशी खूप कमी माणसं असतात जी यश मिळेपर्यंत जिद्द सोडत नाही; मग ना ते समाजाच्या टोमण्यांना जुमानतात ना घरच्यांच्या दबावाला.. अशीच प्रयत्नांची पराकाष्ठा करायला लावणारी, संयमाचा अंत पाहणारी, इच्छाशक्ती आणि स्वप्नाप्रती प्रमाणिकता तपासणारी परीक्षा म्हणजे यूपीएससी, यूनियन पब्लिक सर्विस कमिशन!
अनेक विद्यार्थी या शर्यतीत उतरतात मात्र शेवट पर्यन्त टिकून यशाला गवसणी घालणारे फारच मोजके असतात. अशाच मोजक्यांमध्ये समावेश होतो ‘नेहा ब्यादवाल’चा!
लहानपणापासून आईवडिलांचा सहवास कमी, हिन्दी- इंग्रजी भाषेचा फारसा संबंध नाही, पाचवी मध्ये नापास, यूपीएससी परीक्षेतही चार वेळा अपयश पण तरीही हार न मानता “सपने देखने की कोई उम्र नहीं होती, बस हौसला होना चाहिए, उड़ने के लिए पंख अपने आप मिल जाते हैं” अस म्हणत वयाच्या २५ च्या वर्षी यूपीएससी रॅंक 569 मिळवून त्या आयएएस बनल्या.चला आज जाणून घेवूयात ‘आयएएस नेहा’ची कहाणी ..
राजस्थानच्या जयपुरमधील नेहा ब्यादवाल यांनी वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण करून अनेक तरुणांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवल आहे. हिंदी बोलण्याच्या भीतीमुळे शाळेत गप्प राहणारी ही मुलगी आज आपल्या दृढनिश्चयाने आणि मेहनतीने IAS अधिकारी बनली आहे. अपयशाला संधीत बदलण्याची आणि स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्याची ताकद नेहाच्या या यशोगाथे मधून प्रत्येकाने घेण्याजोगी आहे.
नेहाचा जन्म जयपुरमध्ये झाला, परंतु त्यांचे बालपण आणि शिक्षण छत्तीसगडमधील रायपूर येथे झाले. त्यांचा बहुतांश वेळ आजी-आजोबांसोबतच गेला,रायपूर मध्ये राजस्थानी भाषेचा प्रभाव होता. घरात हिंदी किंवा इंग्रजीचा फारसा वापर नव्हता, त्यामुळे शाळेतही कधी हिंदी बोलण्याची सवय त्यांना लहानपणापासूनच लागली नाही. वयाच्या तिसऱ्या वर्षी शाळेत प्रवेश घेताना त्या रडल्या नाहीत, ही गोष्ट आजही त्यांच्या आईला आश्चर्यचकित करते.
नेहाला लहानपणापासूनच लोकांशी संवाद साधण्याची आवड होती, परंतु भोपाळमधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतल्यानंतर त्यांना नव्या आव्हानांचा सामना करावा लागला. शाळेत हिंदी बोलल्यास दंड आकारला जायचा, त्यामुळे त्या गप्प राहू लागल्या. याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावरही झाला आणि त्या पाचव्या इयत्तेत नापास झाल्या. पण नेहाने हार मानली नाही. त्यांनी हिंदी माध्यमात जाण्याऐवजी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्याचे ठरवले आणि सहावीपासून दहावीपर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली.
11 वी आणि 12 वीच्या काळात पुन्हा काही अडचणी आल्या, परंतु नेहाने प्रत्येक संकटाला संधी म्हणून स्वीकारले. रायपूरच्या डीबी गर्ल्स कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्या कॉलेजमध्ये टॉपर ठरल्या. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी इतरांना मार्गदर्शन करण्याची प्रेरणा मिळाली. याच काळात त्यांनी यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला. नेहाने वयाच्या 19 व्या वर्षी दिल्लीतील वाजीराम आणि रवी येथे यूपीएससीच्या तयारीसाठी कोचिंग घेतले, परंतु नंतर त्या रायपूरला परतल्या आणि स्वयंअध्ययनावर भर दिला. त्यांनी SSC सारख्या परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केल्या, परंतु त्यांचे ध्येय फक्त सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाणे होते. अखेर, चौथ्या प्रयत्नात त्यांनी 2023 मध्ये यूपीएससी परीक्षेत 569 वी रँक मिळवून आपले स्वप्न पूर्ण केले.
नेहा सांगतात की, यूपीएससीच्या तयारीदरम्यान त्यांच्यासमोर कोणतीही गोष्ट अडथळा बनली नाही. अपयश आले तेव्हा त्यांनी दुप्पट मेहनत केली. त्या म्हणतात, “प्रत्येक समस्येचे समाधान असते, फक्त आपला उत्साह आणि ध्येयनिष्ठा कायम ठेवायची असते.” नेहाने स्टेज फियरवर मात केली, भाषेच्या अडथळ्यांना पार केले आणि आपल्या कठोर परिश्रमाने यश मिळवले. नेहा ब्यादवाल यांची कहाणी सांगते की, कोणतीही अडचण तुमच्या स्वप्नांपासून तुम्हाला रोखू शकत नाही,फक्त तुमच्याकडे दृढनिश्चय आणि मेहनतीची तयारी असली पाहिजे. तुम्ही जर तुमच्या स्वप्नापासून भरकटला असाल तर पुन्हा मार्गावर या आणि तयारीला लागा कारण देर आये दुरुस्त आये!
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रज्ञा शिंदे