पुणे, २८ सप्टेंबर २०२२ : पुण्याचा रिंग रोडचा प्रकल्प दृष्टिपथात असतानाच, पुण्यामध्ये मागील बऱ्याच वर्षापासून चर्चेत असलेला एचसीएमटीआर (उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग) मार्गावर निओ मेट्रो सुरू करण्यासाठी या प्रकल्प आराखड्याच (डीपीआर) महा मेट्रोकडून महापालिकेला सादरीकरण करण्यात आलं.
पुणे शहरामध्ये या प्रकल्पांतर्गत वर्तुळाकार मार्गा शेजारी ४३.८४ कि.मी. लांबीची व तीस मीटर उंचीवरून ही निओ मेट्रो धावणार आहे. या प्रकल्पाला सुमारे ४ हजार ९४० कोटी रुपये खर्च येणार आहे.
पुणे महानगरपालिकेमध्ये महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ व हेमंत सोनवणे यांनी या डीपीआरचं सादरीकरण केलं. सादरीकरणावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, प्रकल्प विभागाचे प्रमुख श्रीनिवास बोनाला आदी उपस्थित होते. या प्रकल्पाचं हे प्राथमिक सादरीकरण आहे. पुढच्या आठवड्यात प्रस्तावित डीपीआरसह निओ मेट्रो मार्गावर भेट दिली जाणार आहे.
बोपोडी पासून सुरू होणाऱ्या इलोव्हेटेड निओ मेट्रो मार्गावर लोहगाव विमानतळाबरोबर पुणे स्टेशन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सेनापती बापट रोड, केळेवाडी, पौडफाटा, अलंकार पोलीस ठाणे, सिद्धी गार्डन, सणस ग्राउंड, लक्ष्मी नारायण चौक, सिटी प्राइड स्टेशन, मार्केट यार्ड, गंगाधाम चौक, बिबवेवाडी, लुल्लानगर, डेक्कन महाविद्यालय आदींसह शहराच्या मध्यवर्ती भागातील व गर्दीच्या भागात ४५ स्थानकांचा समावेश असणार आहे. या मेट्रो प्रकल्पासाठी एक किलोमीटर मार्गीकेला ११२ कोटी रुपये खर्च होणार आहे. हाच खर्च एचटीएमआरसाठी प्रती किलोमीटर २५० कोटी रुपये इतका अपेक्षित धरण्यात आला होता.
खडकवासला ते खराडीपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो मार्गाचा सुमारे २८ कि.मी. अंतराचा आराखडाही महामेट्राेने महापालिकेकडं सादर केला. याविषयी महापालिका प्रशासन आराखडा अभ्यासून महामेट्रोला आपल्या सूचना कळवणार आहे. या मार्गावर २५ हून अधिक स्थानकं असणार आहेत. प्रस्तावित मार्गासाठी सुमारे ८ हजार ५८५ काेटी खर्च अपेक्षित आहे. या मार्गासाठी शहरातील स्वारगेट, सिंहगड रोड, साेलापूर रोड या ठिकाणचे उड्डाणपूल पाडले जाणार नसल्याचा दावा महामेट्राेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर