पुणे ८ फेब्रुवारी २०२५ : दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या पाच वर्षांत (२०१८-२०२४, करोना काळ वगळून) ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपीच्या घटना घडल्या आहेत, त्या केंद्रांवर आता बाहेरून केंद्रसंचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये दहावी व बारावीच्या ११०४ परीक्षा केंद्रांपैकी तब्बल ३६० केंद्रांवर हा निर्णय लागू होणार आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक १०४ केंद्रे अशा प्रकारे नवीन व्यवस्थापनाखाली असतील. बारावीच्या ४६० केंद्रांपैकी २०५ केंद्रे आणि दहावीच्या ६४४ केंद्रांपैकी १५५ केंद्रांवर बाहेरच्या शाळांमधून शिक्षक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
शिक्षकांच्या विरोधानंतर सुधारित निर्णय घेण्यात आला असून, आता कॉपी रोखण्यासाठी आणखी कठोर पावले उचलली जात आहेत. फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या या परीक्षांसाठी विभागीय मंडळाने तयारी पूर्ण केली आहे. परीक्षा स्वच्छ आणि पारदर्शक पार पडावी यासाठी ही नवी व्यवस्था लागू करण्यात आली असल्याचे विभागीय सचिव डॉ. वैशाली जामदार यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी :सोनाली तांबे